काटेपूर्णा धरणात ६९ टक्के जलसाठा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2020 03:44 PM2020-03-02T15:44:03+5:302020-03-02T15:44:09+5:30
धरणात मुबलक जलसाठा उपलब्ध झाल्याने खारपाणपट्ट्यातील ६४ गावांचा पाणी प्रश्न मिटला आहे.
अकोला : सिंचनासाठी पाण्याची उचल कमी होत असल्याने यावर्षी काटेपूर्णा धरणातील जलसाठा ६९.४३ टक्के उपलब्ध आहे. अकोला शहरासाठी २४ दशलक्ष घनमीटर पाण्याचे आरक्षण या धरणातून करण्यात आले आहे. महिन्याला यातून दोन दलघमी पाण्याचा वापर होत आहे.
याशिवाय मोर्णा या मध्यम धरणात ६७.३४ टक्के, निर्गुणात ५७.३७, उमा धरणात मात्र ३२.७९ टक्के जलसाठा आहे. घुंगशी बॅरेजमध्ये ६७.८१ टक्के पाणी शिल्लक आहे. त्यामुळे यावर्षी रब्बी हंगामासाठी मुबलक पाणी उपलब्ध आहे. सिंचनासाठी पाणी सोडण्यात येत आहे. यावर्षी उशिरा पाणी सोडण्यात आले; परंतु शेतकऱ्यांची मागणीच अपुरी असल्याने काटेपूर्णा धरणातून दररोज १६० क्युसेस पाणी सिंचनासाठी सोडण्यात येत आहे.
काटेपूर्णा धरणातून अकोला शहर, मूर्तिजापूर, अकोला औद्योगिक वसाहत व खांबोरा पाणी पुरवठा योजनेतून ६४ खेड्यांना पाणी सोडण्यात येत आहे. काटेपूर्णा धरणातून ८ हजार ३२५ हेक्टरला सिंचनासाठी पाणी सोडण्याचे नियोजन आहे. तथापि, यावर्षी आतापर्यंत ४ हजार हेक्टरलाच पाणी सोडण्यात येत आहे. यावर्षी काटेपूर्णा धरणात मुबलक जलसाठा उपलब्ध झाल्याने खारपाणपट्ट्यातील ६४ गावांचा पाणी प्रश्न मिटला आहे.