७९५ शेतकऱ्यांना सौर कृषी पंपाचा आधार

By admin | Published: April 24, 2017 01:54 AM2017-04-24T01:54:59+5:302017-04-24T01:54:59+5:30

अकोला परिमंडळ : महावितरणचे सहकार्य

7 9 5 Farmers' Solar Farm Pumps | ७९५ शेतकऱ्यांना सौर कृषी पंपाचा आधार

७९५ शेतकऱ्यांना सौर कृषी पंपाचा आधार

Next

अकोला: शेतकऱ्यांना अपारंपरिक ऊर्जा स्रोताद्वारे सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केंद्र व राज्य शासनाच्या वतीने महावितरणच्या साहाय्याने सुरू करण्यात आलेल्या अटल सौर ऊर्जा कृषी पंप योजनेंतर्गत अकोला परिमंडळातील तीन जिल्ह्यांमध्ये मार्च, २०१७ अखेरपर्यंत ७९५ सौर ऊर्जा पंप कार्यान्वित झाले आहेत. अकोला, बुलडाणा व वाशिम या तीन जिल्ह्यांसाठी सौर पंपांचे एकूण उद्दिष्ट ३,९६० असून, यापैकी केवळ ७९५ पंप कार्यान्वित झाल्याने या योजनेच्या गतीला काहीशी खीळ बसल्याचे चित्र आहे.
पारंपरिक वीजनिर्मितीकरिता असलेल्या मर्यादा आणि वाढती मागणी, यामुळे वीज भारनियमन केले जाते. शेतकऱ्यांच्या कृषी पंपाला पुरेशी वीज उपलब्ध होत नाही. विहिरींना पाणी असूनही केवळ विजेअभावी सिंचनात अडथळे येतात. यावर तोडगा म्हणून शेतकऱ्यांना अनुदानावर सौर कृषी पंप वितरित करण्याची योजना सुरू करण्यात आली आहे. यामध्ये लाभार्थी शेतकऱ्यांना ७.५ अश्वशक्तीपासून ते तीन अश्वशक्ती क्षमतेचा सौर ऊर्जेवर चालणारा कृषी पंप देण्यात येतो. दहा एकरांपर्यंत शेती असलेले शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत. यासाठी लाभार्थी हिस्सा म्हणून शेतकऱ्याला केवळ पाच टक्के रक्कम भरावी लागते. केंद्र सरकार ३० टक्के, तर राज्य सरकार पाच टक्के अनुदान देते. उर्वरित ६० टक्के रक्कम कर्ज स्वरूपात उपलब्ध करून देणार असून, हे कर्ज महावितरण टप्प्याटप्प्याने फेडणार आहे. म्हणजे शेतकऱ्याला केवळ पाच टक्के रक्कम भरून सौर कृषी पंप मिळविता येतो.
३१ मार्च २०१७ पर्यंत अकोला, वाशिम व बुलडाणा जिल्ह्यातील ३,८७३ शेतकऱ्यांनी या योजनेसाठी अर्ज भरले. यापैकी ३,१४० शेतकऱ्यांचे अर्ज मंजूर झाले असून, त्यापैकी २,९७३ शेतकऱ्यांनी कोटेशन भरले आहे. यापैकी १,३३९ शेतकऱ्यांनी लाभार्थी हिस्सा भरला आहे. या योजनेंतर्गत अकोला जिल्ह्यात २४८, बुलडाणा जिल्ह्यात ३२१, तर वाशिम जिल्ह्यात २२६ शेतकऱ्यांच्या शेतात सौर कृषी पंप कार्यान्वित झाले आहेत.

Web Title: 7 9 5 Farmers' Solar Farm Pumps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.