पिंपळगाव चांभारे येथे ७० कोंबड्यांचा मृत्यू!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:18 AM2021-01-21T04:18:02+5:302021-01-21T04:18:02+5:30
निहिदा: बार्शीटाकळी तालुक्यातील पिंपळगाव चांभारे येथे एका शेतकऱ्याच्या घरगुती पाळलेल्या ७० कोंबड्यांचा अज्ञात रोगाने मृत्यू झाल्याची घटना १८ जानेवारी ...
निहिदा: बार्शीटाकळी तालुक्यातील पिंपळगाव चांभारे येथे एका शेतकऱ्याच्या घरगुती पाळलेल्या ७० कोंबड्यांचा अज्ञात रोगाने मृत्यू झाल्याची घटना १८ जानेवारी रोजी उघडकीस आली. त्यामुळे परिसरात बर्ड फ्लूच्या धास्तीने शेतकऱ्यांसह ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दोन दिवस उलटूनही पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी पाहणी न केल्याने ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
पिंजर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पिंपळगाव चांभारे येथे रमेश सुरडकर या शेतकऱ्याच्या पाळलेल्या ७० कोंबड्यांचा अज्ञात आजाराने मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. त्यामुळे परिसरात बर्ड फ्लूची धास्ती निर्माण झाली आहे. याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन परिसरात उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. (फोटो)
----------------------
पिंपळगाव चांभारे येथील घटनेची माहिती मिळाली असून, मी याबाबत पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना सांगून पाहणी करण्यासाठी पाठवतो. नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही.
-किशोर काळबांडे, गटविकास अधिकारी, बार्शीटाकळी
-----------------------------
पिंजर येथील पशुवैद्यकीय रुग्णालय नावापुरतेच असून, पशुपालकांना सुविधा मिळत नाही. येथे कायमस्वरूपी पशुवैद्यकीय अधिकारी नसल्याने पशुपालकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागते.
-अनिल पेंधे, शेतकरी, पिंजर
--------------------------------
पिंजर येथील पशू रुग्णालय नावापुरतेच!
पिंजर येथील पशू रुग्णालय नावापुरतेच असून, पशुपालकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. येथे गत काही महिन्यांपासून कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी नसल्याने पशुपालक त्रस्त झाले आहेत.