७० वर्षीय वृद्ध महिलेवर अत्याचार; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल, अकोल्यातील धक्कादायक घटना 

By आशीष गावंडे | Published: May 29, 2024 08:05 PM2024-05-29T20:05:06+5:302024-05-29T20:06:54+5:30

दुचाकीवरुन साेडून देण्याचा बहाना; सीसीटीव्ही फुटेजची तपासणी

70-year-old woman assaulted Case registered against three, shocking incident in Akola  | ७० वर्षीय वृद्ध महिलेवर अत्याचार; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल, अकोल्यातील धक्कादायक घटना 

७० वर्षीय वृद्ध महिलेवर अत्याचार; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल, अकोल्यातील धक्कादायक घटना 

अकाेला : दुचाकीवरून सोडून देण्याचा बहाना करून एका ७० वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार केल्याची संताप जनक घटना २८ मे राेजी दुपारी दाेन वाजताच्या सुमारास जिल्ह्यातील बोरगाव मंजू परिसरातील शेतशिवारात घडली. वृद्ध महिलेच्या तक्रारीवरून बोरगाव मंजू पोलिसांनी तीन अज्ञात इसमांविराेधात गुन्हा दाखल केला असून आरोपी ३० ते ३५ वर्षे वयोगटातील असल्याचा अंदाज आहे. दरम्यान,घटनेचे गांभीर्य लक्षात घेता स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलिस निरीक्षक शंकर शेळके व त्यांच्या पथकाने राष्ट्रीय महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केल्याची माहिती आहे. 

अकोला बस स्थानकावरून ७० वर्षीय वृद्ध महिला ही २८ मे राेजी दुपारी एसटी बसने मुर्तिजापूरलगतच्या दाळंबी गावाला जाण्यासाठी निघाली होती. दुपारी सुमारे दाेन वाजता दाळंबी गावात जाण्यासाठी ही महिला राष्ट्रीय महामार्गावर बसमधून उतरली. तेथून गावच्या रस्त्याने पायी जात असताना त्यावेळी अज्ञात तीन इसम दाेन दुचाकीने आले आणि गावात सोडून देतो, असं सांगत तिला वाहनावर बसवले. निर्मनुष्य असलेल्या रस्त्यालगतच्या एका लिंबाच्या शेतशिवारात नेऊन या तीघांपैकी एका युवकाने तिच्यावर अत्याचार केला. या प्रकाराची वाच्यता केल्यास ठार मारण्याची धमकी वृद्ध महिलेला देण्यात आली. 

यादरम्यान गावातील दोन व्यक्ती रस्त्यावरून जात असताना वृद्ध महिलेला दिसले असता तिने आरडाओरड केली. आवाज कानावर पडताच त्या दोन्ही व्यक्तींनी शेताकडे धाव घेतली. त्यावेळी अत्याचार करणाऱ्या युवकाने घटनास्थळावरुन पळ काढला. मदतीसाठी गेलेल्या त्या दोघांनी पीडित महिलेला तिच्या घरी नेले. महिलेने घडलेला प्रकार कुटुंबीयांना सांगितल्यानंतर कुटुंबियांनी बोरगाव मंजू पोलिस स्टेशनमध्ये धाव घेतली. तसेच या प्रकरणी तक्रार नोंदवली असता, पोलिसांनी अज्ञात तीन जणांविराेधात भादंवि कलम ३७६, ३४ नुसार गुन्हे दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे. 

पाेलिसांनी घटनास्थळाची केली पाहणी
बाेरगाव मंजू पाेलिस स्टेशनचे पाेलिस निरीक्षक मनोज केदारे यांच्यासह पोलिस उपनिरीक्षक सतीष सपकाळ, संतोष निंबेकर, योगेश काटकर, सचिन सोनटक्के, महिला पोलिस कर्मचारी वनिता चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला. तसेच रात्री वृध्द महिलेची जिल्हा सामान्य रुग्णालयात वैद्यकीय चाचणी केली. 
 
जिल्हा पाेलिस अधीक्षकांनी दिले निर्देश
दरम्यान, घडलेल्या घटनेची जिल्हा पाेलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी गंभीर दखल घेत स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलिस निरीक्षक शंकर शेळके यांना सखाेल तपास करण्याचे निर्देश दिले. त्यानुषंगाने पोलिस पथके गठीत करण्यात आले असून ‘एलसीबी’चे पाेलिस निरीक्षक शंकर शेळके, पोलिस निरीक्षक मनोज केदारे, ‘पीएसआय’ गाेपाल जाधवसह कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. पाेलिसांकडून मंगळवारी रात्रभर शोध मोहीम राबविण्यात आल्याची माहिती आहे.

Web Title: 70-year-old woman assaulted Case registered against three, shocking incident in Akola 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.