फणी गावावर ७० वर्षांच्या म्हातारीचे अधिराज्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:22 AM2021-09-22T04:22:06+5:302021-09-22T04:22:06+5:30
संजय उमक मूर्तिजापूर : तालुक्यात निर्माण झालेल्या प्रकल्पामुळे अनेक गावे उजाड झाली; मात्र मूर्तिजापूरपासून काही अंतरावर असलेल्या किणी, फणी ...
संजय उमक
मूर्तिजापूर : तालुक्यात निर्माण झालेल्या प्रकल्पामुळे अनेक गावे उजाड झाली; मात्र मूर्तिजापूरपासून काही अंतरावर असलेल्या किणी, फणी हे गाव मात्र अपवाद आहे. गावात राहणाऱ्या लोकांनी गाव सोडून विविध ठिकाणी स्थायिक झाले, परंतु या गावात केवळ एकच ७० वर्षांची म्हातारी वास्तव्य करीत आहे. एकेकाळी दोनशे लोकवस्ती असलेल्या गावात आता ७० वर्षीय म्हातारीचे अधिराज्य असल्याचे चित्र आहे.
मूर्तिजापूरपासून १२ किलोमीटरवर फणी गाव वसलेले होते. धानोरा वैद्य, किणी, फणी या तीन गावांचा समावेश असलेली धानोरा वैद्य गट ग्रामपंचायत आहे. या गट ग्रामपंचायतीमध्ये फणी या गावात दोनशेच्यावर लोकवस्ती होती. गावात रस्ते, पाणी, वीज या सर्व सुविधा अद्यापही आहेत. सुविधा असतानासुद्धा येथील लोकांनी इतरत्र वास्तव्य केल्याने फणी हे गाव उजाड झाले, तरी अन्नपूर्णा देवीदास खंडारे ही ७० वर्षांची म्हातारी अजूनही वास्तव्यास आहे. या म्हातारीचे घरही आता क्षतिग्रस्त झाले असून, पावसाळ्याच्या दिवसात घर गळत असल्याने म्हातारीने शेजारीच असलेल्या किणी गावात आता तात्पुरता आश्रय घेतला आहे. या गावातील सर्व घरांची पडझड झाली असून, काही घरांचे अवशेष शिल्लक राहिले आहेत. केवळ हनुमानाचे मंदिर व एक हातपंप सुस्थितीत आहे.
-----------------
तालुक्यातील १८ गावे उजाड
तालुक्यात एकूण २६४ गावे आहेत. त्यापैकी १८ गावे उजाड असून, एकेकाळी दोनशेच्यावर लोकसंख्या असलेल्या फणी गावातील लोकांनी हळूहळू आपले गाव सोडले असल्याने तेही उजाड अवस्थेत झाले आहे. २०११च्या जनगणनेनुसार या गावाची लोकसंख्या केवळ ३५ असून, तेथे १७ महिला व १९ पुरुष वास्तव्य करीत असल्याची शासकीय दरबारी नोंद आहे. प्रत्यक्षात गावात भेट दिली असता एक ७० वर्षीय म्हातारी वास्तव्य करीत असल्याचे निदर्शनास आले. सदर म्हातारी किणी या शेजारील गावातील गुरे चारून आपला उदरनिर्वाह करीत आहे.
------------------------
पूर्वी या गावात लोकवस्ती होती, हळूहळू गावातील लोकांनी आपली घरे सोडली, त्यामुळे आता या गावात माझ्याशिवाय दुसरे कोणीच राहत नाही. मी गाव सोडले तर संपूर्ण गावच उजाड होईल.
-अन्नपूर्णाबाई खंडारे, रहिवासी, फणी
--------------------
फणी, किणी आणि धानोरा वैद्य ही तीन गावे मिळून धानोरा गट ग्रामपंचायत आहे. परंतु आजमितीस फणी गावात एका म्हातारीशिवाय कोणीच राहत नाही. संपूर्ण गावच उजाड झाले आहे. तीचे घर गळत असल्याने तीला किणी गावात तात्पुरता आश्रय दिला आहे.
-जयश्री तायडे, किणी, पंचायत समिती सदस्या, मूर्तिजापूर