महावितरण राज्यभरात लावणार ७० हजार झाडे
By admin | Published: July 2, 2017 01:47 PM2017-07-02T13:47:49+5:302017-07-02T13:47:49+5:30
महावितरणच्यावतीने राज्यभरातील विविध कार्यालयात सुमारे ७० हजारांपेक्षा अधिक वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे.
वृक्षारोपण मोहिमेस प्रारंभ : १६ परिमंडळ कार्यालयांतर्गत होणार वृक्ष लागवड
अकोला : महावितरणच्यावतीने राज्यभरातील विविध कार्यालयात सुमारे ७० हजारांपेक्षा अधिक वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. या मोहिमेचा शुभारंभ मुंबई येथील प्रकाशगड मुख्यालयात महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आला.
१ ते ७ जुलैदरम्यान चार कोटी वृक्ष लागवड करण्याचा राज्य शासनाचा संकल्प आहे. या संकल्पात महावितरणच्यावतीने मोठे योगदान देण्यात येत असून, त्यांतर्गत राज्यभरातील १६ परिमंडल कार्यालयांतर्गत येणाऱ्या विविध कार्यालयात ७० हजारांपेक्षा अधिक वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. महावितरणच्यावतीने मागील वर्षीही संपूर्ण राज्यात मोठ्या प्रमाणात वृक्षांची लागवड करण्यात आली होती. मागील वर्षी केलेल्या वृक्षाचे संगोपन करण्यासाठी प्रत्येक कर्मचाऱ्याला एका झाडाच्या संगोपन करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. यावर्षीही वृक्षारोपण करण्यात आलेल्या झाडांचे कर्मचारी संगोपन करणार आहेत.
प्रकाशगड मुख्यालयात आयोजित वृक्षारोपणाच्या कार्यक्रमात महावितरणचे संचालक सुनील पिंपळखुटे, दिनेशचंद्र साबू आणि कार्यकारी संचालक शंकर शिंदे, सचिन ढोले, श्रीकांत जलतारे यांनी वृक्षारोपण केले. यावेळी मुख्यालयातील अभियंते, अधिकारी व कर्मचारी यांनीही कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला.