काटेपूर्णा धरणात आता ७२ टक्के साठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2020 12:01 PM2020-01-25T12:01:55+5:302020-01-25T12:02:08+5:30
पिण्याच्या पाण्यासह यावर्षी सिंचनाला या धरणातून पाणी सोडण्यात येत आहे; परंतु अपेक्षित मागणी नसल्याचे चित्र आहे.
अकोला : काटेपूर्णा धरणातील जलसाठा आजमितीस ७२.६३ टक्के आहे. १०० टक्के जलसाठा या धरणात संचयित झाला होता. दोन महिन्यांत २८ टक्के पाणी वापर झाला आहे. पिण्याच्या पाण्यासह यावर्षी सिंचनाला या धरणातून पाणी सोडण्यात येत आहे; परंतु अपेक्षित मागणी नसल्याचे चित्र आहे.
गतवर्षी सर्वच धरणात स्थिती वाईट असताना, यावर्षी पावसाने जिल्ह्याला तारले असून, सप्टेंबर महिन्यापासून सतत व दमदार पाऊस पडला. परतीच्या पावसाने त्यामध्ये आणखी भर घातल्याने जिल्ह्यातील सर्वच प्रकल्प ‘ओव्हरफ्लो’ झाले. अकोला पूर संरक्षण योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या दगडपारवा प्रकल्पातूनही यावर्षी पाण्याचा विसर्ग करावा लागला. आजमितीस काटेपूर्णा धरणात ७२.६३ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. मोर्णा या मध्यम स्वरू पाच्या धरणात ७९.१८ टक्के, निर्गुणात ८१.९१ टक्के, उमा धरणात ६३.७० टक्के तसेच घुंगशी बॅरजेमध्ये ८३.९० टक्के पाणी शिल्लक आहे. त्यामुळे यावर्षी रब्बी हंगामासाठी मुबलक पाणी असल्याने सिंचनासाठी पाणी सोडण्यात येत आहे. यावर्षी उशिरा पाणी सोडण्यात आले असून, शेतकऱ्यांची मागणी मात्र कमी आहे.
काटेपूर्णा धरणातून अकोला शहर, मूर्तिजापूर, अकोला औद्योगिक वसाहत व खांबोरा पाणी पुरवठा योजनेतून ६४ खेड्यांना पाणी सोडण्यात येत आहे. काटेपूर्णा धरणातून ८ हजार ३२५ हेक्टरला सिंचनासाठी पाणी सोडण्याचे नियोजन आहे. तथापि, यावर्षी आतापर्यंत एक हजार हेक्टरलाच पाणी सोडण्यात येत आहे. म्हणजेच आजमितीस दररोज केवळ १३० क्युसेसचाच या धरणातून विसर्ग सुरू आहे.
यावर्षी काटेपूर्णा धरणात मुबलक जलसाठा उपलब्ध झाल्याने खारपाणपट्ट्यातील ६४ गावांचा पाणी प्रश्न मिटला आहे. गतवर्षी या भागात पाणी टंचाईचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. मूर्तिजापूरचाही पाणी पुरवठा बंद करण्यात आला होता, हे विशेष.