अकोला जिल्ह्यात सोयाबीनची ७२ टक्के पेरणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2020 10:36 AM2020-07-06T10:36:25+5:302020-07-06T10:36:34+5:30
जिल्ह्यात सोयाबीनची ७२ टक्क्यांहून अधिक पेरणी आटोपली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : लॉकडाऊनच्या काळात ठप्प झालेली बाजारपेठ अन खरिपाच्या हंगामात सोयाबीनचे बियाणे न उगवण्याचे संकट यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुबार पेरणीचा फटका सोसावा लागला. अशातच गत आठवड्यात झालेल्या हलक्या ते मध्यम पावसानंतर जिल्ह्यातील शेवटच्या टप्यातील पेरण्यांना वेग आला असून, आतापर्यंत ६७.२२ टक्के पेरणी आटोपली. त्यात सोयाबीनचा ७२ टक्के वाटा आहे.
जिल्ह्यातील पेरण्या सध्या अंतिम टप्प्यात आल्या असून, अनेक भागात कपाशीला खतांच्या मात्रा देण्यासह निंदणाची लगबग वाढली आहे. आतापर्यंत झालेल्या पेरणीत सोयाबीनचे सर्वाधिक क्षेत्र आहे. जिल्ह्यात सोयाबीनची ७२ टक्क्यांहून अधिक पेरणी आटोपली आहे. यातील काही शेतकऱ्यांचे बियाणे उगवलेच नसल्याने त्यांना दुबार पेरणीचा फटका सोसावा लागला. त्यासाठी काही शेतकºयांना कर्जदेखील काढावे लागले. बियाणे बोगस निघाल्याने बियाणे कंपन्यांविरोधात शेतकºयांकडून तक्रारीही होत आहेत; मात्र कारवाईला उशीर होत असल्याने शेतकºयांमधून रोष व्यक्त केला जात आहे. संकटाच्या या काळातही ८४ टक्क्यांहून अधिक क्षेत्रावर पेरणी झाली आहे; मात्र जिल्ह्यात अनेक भागात अद्यापही समाधानकारक पाऊस नसल्याने गावागावात पावसाची प्रतीक्षा आहे.