७२ हजारांवर खड्डय़ांची कामे रेंगाळली!
By admin | Published: June 12, 2016 02:37 AM2016-06-12T02:37:26+5:302016-06-12T02:37:26+5:30
अकोला जिल्ह्यात वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट २ लाख २२ हजार : खड्डे झाले दीड लाख
संतोष येलकर /अकोला
जिल्हय़ात येत्या १ जुलै रोजी एकाच दिवशी २ लाख २२ हजार ३३२ वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट असले तरी, झाडे लावण्यासाठी शनिवारपर्यंत जिल्ह्यात १ लाख ५0 हजार खड्डे खोदण्यात आले. उर्वरित ७२ हजारांवर खड्डे खोदण्याचे काम रेंगाळल्याने, खड्डय़ांअभावी झाडे लावणार कशी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
यावर्षीच्या पावसाळ्यात वन महोत्सवाच्या कालावधीत १ जुलै रोजी एकाच दिवशी राज्यभरात दोन कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट राज्य शासनामार्फत ठरविण्यात आले आहे. या पृष्ठभूमीवर जिल्हा प्रशासनामार्फत वन विभाग आणि इतर विविध २२ यंत्रणा मिळून जिल्ह्यात २ लाख २२ हजार ३३२ वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. वृक्ष लागवडीसाठी खड्डे खोदण्याचे काम संबंधित यंत्रणांना २0 जूनपर्यंत पूर्ण करावयाचे आहे. त्यानुषंगाने झाडे लावण्यासाठी जिल्ह्यात यंत्रणांकडून खड्डे खोदण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामध्ये शनिवार, ११ जूनपर्यंत वन विभागामार्फत जिल्ह्यात १ लाख २ हजार आणि इतर २२ यंत्रणांमार्फत ४८ हजार असे एकूण १ लाख ५0 हजार खड्डे खोदण्याचे काम पूर्ण झाले. उर्वरित ७२ हजार ३३२ खड्डे खोदण्याचे काम अद्याप बाकी आहे. पावसाळा तोंडावर आला आहे, पाऊस सुरू झाल्यास खड्डे खोदण्याचे काम करणे शक्य होणार नाही. त्यामुळे वृक्ष लागवडीसाठी रेंगाळलेली ७२ हजार ३३२ खड्डे खोदण्याची कामे केव्हा पूर्ण होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
खड्डे नाही; झाडे लावणार कशी?
जिल्ह्यात वृक्ष लागवडीसाठी आवश्यक असलेली ७२ हजार ३३२ खड्डे खोदण्याची कामे संबंधित यंत्रणांकडून रखडली आहेत. त्यामुळे रेंगाळलेली खड्डय़ांची कामे पूर्ण न झाल्यास झाडे लावणार कशी, असा प्रश्न निर्माण होत आहे.