जिल्ह्यात ७३ गुरुजींना मुख्यालयी राहण्याचे वावडे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:23 AM2021-08-14T04:23:44+5:302021-08-14T04:23:44+5:30
संतोष येलकर अकोला : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या अहवालानुसार जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळांमधील ३ हजार २६० शिक्षक मुख्यालयी ...
संतोष येलकर
अकोला : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या अहवालानुसार जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळांमधील ३ हजार २६० शिक्षक मुख्यालयी राहत असून, ७३ शिक्षक मुख्यालयी राहत नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या ७३ गुरुजींना मुख्यालयी राहण्याचे वावडे असल्याचे वास्तव समोर आले आहे.
जिल्हा परिषद शिक्षण समितीच्या सभेत समिती सदस्य आम्रपाली खंडारे यांच्या मागणीनुसार जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत जिल्ह्यात कार्यरत शिक्षकांपैकी मुख्यालयी राहत नसलेल्या शिक्षकांची माहिती सादर करण्याचे निर्देश महिनाभरापूर्वी प्राथमिक शिक्षण विभागाला देण्यात आले होते. त्यानुसार जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागामार्फत जिल्ह्यात मुख्यालयी राहत असलेल्या आणि मुख्यालयी राहत नसलेल्या प्राथमिक शिक्षक, पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक व केंद्रप्रमुखांची माहिती जिल्ह्यातील गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून मागविण्यात आली होती. प्राप्त माहितीच्या आधारे जिल्ह्यात मुख्यालयी राहणाऱ्या व मुख्यालयी राहत नसलेल्या शिक्षकांचा अहवाल जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागामार्फत तयार करण्यात आला. त्यानुसार जिल्हा परिषदेंतर्गत जिल्ह्यात कार्यरत शिक्षकांपैकी ३ हजार २६० शिक्षक मुख्यालयी राहत असून, ७३ शिक्षक मुख्यालयी राहत नाहीत. त्यामुळे जिल्हा परिषदेंतर्गत ग्रामीण भागातील शाळांमध्ये कार्यरत असलेल्या गुरुजींपैकी ७३ गुरुजींना मुख्यालयी राहण्याचे वावडे असल्याचे वास्तव समोर आले आहे.
एकूण कार्यरत शिक्षक
३३३३
मुख्यालयी राहणारे शिक्षक
३२६०
मुख्यालयी राहत नसलेले शिक्षक
७३
मुख्यालयी राहणाऱ्या शिक्षकांची तालुकानिहाय अशी आहे संख्या!
तालुका शिक्षक पदवीधर शिक्षक मुख्याध्यापक केंद्रप्रमुख
अकोला ५३९ १४९ १६ ८
अकोट ३९६ १०२ १२ ३
बाळापूर ३३२ १०४ ०८ ३
बार्शिटाकळी २९८ ७९ ११ ३
मूर्तिजापूर ३१५ १०० ०४ ८
पातूर ३५५ ...... ....... .....
तेल्हारा ४१५ ........ ...... .......
..........................................................................................................................
मुख्यालयी राहत नसलेल्या
शिक्षकांची अशी आहे संख्या!
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या अहवालानुसार जिल्ह्यातील बाळापूर, बार्शिटाकळी, पातूर व तेल्हारा या चार तालुक्यांत ७३ शिक्षक मुख्यालयी राहत नाहीत. त्यामध्ये बाळापूर तालुक्यात ३, बार्शिटाकळी तालुक्यात ५१, पातूर तालुक्यात १ व तेल्हारा तालुक्यात २ असे एकूण ५७ शिक्षक आणि बार्शिटाकळी तालुक्यात १६ पदवीधर शिक्षक मुख्यालयी राहत नाहीत.
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळांमधील ३ हजार २६० शिक्षक मुख्यालयी राहत असून, ७३ शिक्षक मुख्यालयी राहत नसल्याचे नमूद करण्यात आले आहे.
आम्रपाली खंडारे
सदस्य, जिल्हा परिषद, अकोला.