सामाजिक न्याय भवन इमारतीसाठी ७.३८ कोटी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2019 05:20 PM2019-03-02T17:20:40+5:302019-03-02T17:20:47+5:30
अकोला: शहरातील निमवाडी भागात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन इमारत उभारणीसाठी शासनामार्फत १९ कोटी ४१ लाख ३१ हजार रुपयांच्या अंदाजपत्रकाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून, त्यापैकी पहिल्या टप्प्यात ७ कोटी ३८ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे.
अकोला: शहरातील निमवाडी भागात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन इमारत उभारणीसाठी शासनामार्फत १९ कोटी ४१ लाख ३१ हजार रुपयांच्या अंदाजपत्रकाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून, त्यापैकी पहिल्या टप्प्यात ७ कोटी ३८ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. त्यामुळे सामाजिक न्याय भवन इमारत बांधकामाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.
सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या १ एप्रिल २००६ रोजीच्या निर्णयानुसार राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात सामाजिक न्याय भवन उभारण्यास मान्यता देण्यात आली होती; परंतु अकोल्यात जागा उपलब्ध झाली नसल्याने, सामाजिक न्याय भवन उभारणीचे घोंगडे भिजतच राहिले. २०१४ मध्ये अकोला शहरातील निमवाडीस्थित पोलीस विभागाच्या ताब्यातील जागेपैकी ४० हजार चौरस फूट जागा डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनास उपलब्ध करून देण्यास शासनामार्फत मान्यता देण्यात आली. जून २०१७ मध्ये सामाजिक न्याय भवनाची जागा सामाजिक न्याय विभागाकडे हस्तांतरित करण्यात आली. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन इमारत बांधकामासाठी १९ कोटी ४१ लाख ३१ हजार ६८० रकमेच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात येत असल्याचा निर्णय २१ डिसेंबर २०१८ रोजी शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागामार्फत निर्गमित करण्यात आला. मंजूर निधीपैकी पहिल्या टप्प्यात ७ कोटी ३८ लाख रुपयांचा निधी गत आठवड्यात शासनामार्फत सामाजिक न्याय विभागाच्या सहायक आयुक्त कार्यालयाला प्राप्त झाला. उपलब्ध निधीतून सामाजिक न्याय भवन इमारतीचे बांधकाम लवकरच सुरू करण्यात येणार असल्याने, गत १२ वर्षांपासून प्रलंबित असलेला अकोल्यातील सामाजिक न्याय भवन इमारत बांधकामाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन ५ मार्च रोजी अकोला शहरातील पोलीस मुख्यालयाजवळील निमवाडी येथे होणार आहे, असे सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त अमोल यावलीकर यांनी सांगितले.