कोरोनाकाळात जिल्ह्यात ७४ बालकांनी गमावले पालक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:21 AM2021-05-25T04:21:37+5:302021-05-25T04:21:37+5:30
संतोष येलकर अकोला : कोरोनाकाळात जिल्ह्यात पालक गमावलेल्या १८ वर्षांआतील बालकांचे संपर्क सर्वेक्षण जिल्हा महिला व बालविकास विभागामार्फत पूर्ण ...
संतोष येलकर
अकोला : कोरोनाकाळात जिल्ह्यात पालक गमावलेल्या १८ वर्षांआतील बालकांचे संपर्क सर्वेक्षण जिल्हा महिला व बालविकास विभागामार्फत पूर्ण करण्यात आले असून, या सर्वेक्षणाचा अहवाल सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला. त्यानुषंगाने २१ मेपर्यंत जिल्ह्यात ७४ बालकांच्या पालकांचा (आई किंवा वडील यापैकी एक) कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यानुषंगाने गेल्या १३ महिन्यांच्या कोरोना काळात जिल्ह्यातील ७४ बालकांचे पालक गमावल्याचे वास्तव समोर आले आहे.
कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग आणि कोरोनाबाधित रुग्णांची संख्या लक्षात घेता, कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. त्यामध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यामुळे मृत्यू झाल्याने १८ वर्षांपेक्षा कमी वयोगटातील अनेक बालकांचे पालक गमावले. त्यामध्ये काही बालकांचे पितृछत्र तर काही बालकांचे मातृछत्र हरवले. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कोरानामुळे पालक गमावलेल्या बालकांचे सर्वेक्षण जिल्हा महिला व बालविकास विभागामार्फत करण्यात आले. जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, महानगरपालिका, जिल्ह्यातील नगरपालिका व जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून प्राप्त माहितीनुसार कोरोनामुळे मृत्यू झाल्याने पालक गमावलेल्या १८ वर्षांआतील बालकांची माहिती घेण्यात आली. त्यानुसार कोरोना काळात २१ मेपर्यंत जिल्ह्यात ७४ बालकांचे पालक गमावले. त्यामध्ये काही बालकांची आई तर काही बालकांच्या वडिलांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. कोरोनामुळे जिल्ह्यातील ७४ बालकांचे पालक गमावल्याचा अहवाल जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयामार्फत २४ मे रोजी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्याकडे सादर करण्यात आला.
असा आहे सर्वेक्षण अहवाल!
कोरोना काळात २१ मे २०२१ पर्यंत जिल्ह्यात कोरोना संसर्ग झाल्याने ९०७ व्यक्तींचा मृत्यू झाला. त्यामध्ये ५० वर्षांआतील १६० व्यक्तींचा मृत्यूचा समावेश असून, ५० वर्षांआतील व्यक्तींचा मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबांसोबत संपर्क साधून सर्वेक्षणात माहिती घेण्यात आली. त्यानुसार कोरोनामुळे मृत्यू झाल्याने ७४ बालकांनी पालक गमावले असून, त्यामध्ये काही बालकांची आई व काही बालकांच्या वडिलांचा मृत्यू झाल्याचा समावेश आहे.
गृह भेटीद्वारे चौकशीनंतर
बालकांचे होणार पुनर्वसन !
कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांच्या कुटुंबीयांची जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयामार्फत गृह भेटीद्वारे लवकरच चौकशी करण्यात येणार आहे. त्यामध्ये संबंधित कुटुंबीयांसोबतच चर्चा केल्यानंतर कोरोनामुळे आई किंवा वडील गमावलेल्या बालकांचे पुनर्वसन करण्याची उपाययोजना बालकल्याण समितीमार्फत करण्यात येणार आहे.
कोरोना काळात जिल्ह्यात २१ मेपर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे पालक गमावलेल्या जिल्ह्यातील बालकांचे संपर्क सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून, अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला. त्यानुसार जिल्ह्यात कोरोना काळात ७४ बालकांच्या पालकांचा (आई किंवा वडील यापैकी एक) मृत्यू झाला. पालक गमावलेल्या बालकांचे पुनर्वसन करण्याची उपाययोजना बालकल्याण समितीमार्फत करण्यात येणार आहे.
विलास मरसाळे,
जिल्हा महिला बालविकास अधिकारी