७४ कोटींच्या विकासकामांचे लोकार्पण-भूमिपूजन!
By admin | Published: February 12, 2016 02:17 AM2016-02-12T02:17:45+5:302016-02-12T02:17:45+5:30
विविध शासकीय इमारती, रस्ते कामांचा समावेश
अकोला: शहरासह जिल्हय़ातील ७४ कोटी ५१ लाखांच्या विविध विकास कामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले. त्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला पंचायत समितीसह विविध शासकीय इमारती व अकोल्यातील रस्ते कामांचा समावेश आहे. गुरुवारी दुपारी १२.३0 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात १0.७८ कोटींच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन आणि ८.२३ कोटींच्या जिल्हा नियोजन भवनाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर २.0४ कोटींच्या अकोला पंचायत समिती नवीन इमारतीचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर शहरातील अकोला क्रिकेट क्लब मैदानावर आयोजित विविध शासकीय इमारतींचे लोकार्पण व भूमिपूजन सोहळ्यात जिल्हा शिक्षण व व्यवसाय प्रशिक्षण संस्था, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वसतिगृह, जिल्हा स्त्री रुग्णालय तसेच दहिहांडा पोलीस स्टेशन आणि मूर्तिजापूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय व बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालय इमारतीसह बॉक्सिंग अँकेडमी इमारतीचे भूमिपूजन व लोकार्पण व अकोला शहरातील २0 कोटींच्या रस्ते कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला जिल्हय़ातील लोकप्रतिनिधी व संबंधित अधिकारी उपस्थित होते.