एलईडीचे ७४ टक्के काम पूर्ण; तरीही अंधाराची समस्या कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 01:35 PM2018-12-14T13:35:33+5:302018-12-14T13:36:00+5:30

कंत्राटदाराने आजवर ७४ टक्के काम पूर्ण केल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात असला, तरी मुख्य रस्त्यांसोबतच प्रभागातील अंतर्गत रस्त्यांवर अंधाराची समस्या कायम असल्याचे चित्र दिसून येत आहे.

74 percent of LED's work done; Still the problem of darkness persists | एलईडीचे ७४ टक्के काम पूर्ण; तरीही अंधाराची समस्या कायम

एलईडीचे ७४ टक्के काम पूर्ण; तरीही अंधाराची समस्या कायम

Next

अकोला: महापालिका प्रशासनामार्फत शहरात २० कोटी रुपयांतून एलईडी पथदिव्यांची कामे युद्धस्तरावर सुरू आहेत. संबंधित कंत्राटदाराने आजवर ७४ टक्के काम पूर्ण केल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात असला, तरी मुख्य रस्त्यांसोबतच प्रभागातील अंतर्गत रस्त्यांवर अंधाराची समस्या कायम असल्याचे चित्र दिसून येत आहे. दुसरीकडे पथदिव्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी झोननिहाय नियुक्त केलेल्या चार कंत्राटदारांवर देयकापोटी लाखो रुपयांची उधळण होत असली, तरी पथदिव्यांची समस्या ‘जैसे थे’ आहे. एकूणच, पथदिव्यांच्या संदर्भात विद्युत विभागाचा कारभार हवेत सुरू असून, सत्ताधारी भाजपा ढिम्म असल्याचा सूर अक ोलेकरांमध्ये उमटू लागला आहे.
सोडियम पथदिव्यांमुळे मनपाच्या वीज देयकात प्रचंड वाढ होत असल्याची सबब पुढे करीत २००६ मध्ये तत्कालीन सत्ताधारी भाजपाने ‘सीएफएल’ पथदिव्यांना प्राधान्य दिले होते. प्रशासनाने सीएफएल पथदिव्यांसाठी एशियन नामक कंपनीसोबत २०१३ पर्यंत करारनामा केला. मनपाच्या वीज देयकात घसरण झाल्याचा दावा केला जात असला, तरी सीएफएलच्या अंधुक उजेडामुळे अकोलेकर हैराण झाले होते. त्यात भरीस भर कंपनीचे देयक थकीत राहत असल्यामुळे कंपनीनेसुद्धा पथदिवे देखभाल दुरुस्तीसाठी आखडता हात घेतला. अंधुक उजेडावर उपाय म्हणून आ. गोवर्धन शर्मा, आ. रणधीर सावरकर यांनी लख्ख उजेड देणाऱ्या एलईडी पथदिव्यांसाठी शासनाकडे निधीची मागणी केली. गतवर्षी शासनाने एलईडीसाठी १० कोटींचा निधी मंजूर केला. त्यामध्ये मनपाने चौदाव्या वित्त आयोगातून १० कोटींची तरतूद करीत एकूण २० कोटी रुपयांतून एलईडी पथदिव्यांसाठी निविदा प्रक्रिया राबविली.

‘टायमर’ बिघडले; विद्युत विभाग झोपेत
एकीकडे शहरात एलईडीच्या कामांचा गवगवा केला जात असतानाच दुसरीकडे पथदिव्यांचे ‘टायमर’ बिघडल्यामुळे की काय, पथदिव्यांचा बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. मुख्य रस्त्यांवरील पथदिवे दिवसा सुरू अन् रात्री बंद राहत असल्याने महापालिकेने नियुक्त केलेले झोननिहाय कंत्राटदार दिवसभर करतात तरी काय, असा सवाल उपस्थित होत आहे. कंत्राटदारांवर कारवाई होत नसल्यामुळे विद्युत विभाग संशयाच्या भोवºयात सापडला आहे.

२४ तासांत दुरुस्ती नाहीच!
नादुरुस्त पथदिव्यांच्या तक्रारीसाठी मनपात स्वतंत्र कक्ष आहे. नागरिकांनी तक्रार केल्यास चोवीस तासांच्या आत तक्रारीचे निरसन होणे अपेक्षित असून, तसा करार कंत्राटदारांसोबत करण्यात आला आहे. हद्दवाढीत सामील झालेल्या नवीन प्रभागात पंधरा-पंधरा दिवस पथदिव्यांची दुरुस्ती केली जात नाही, हे येथे उल्लेखनीय.


निम्मे काम आटोपल्याचा दावा!
शहरात मे. रॉयल इलेक्ट्रॉनिक कंपनीने मे २०१७ मध्ये एलईडी पथदिवे लावण्याच्या कामाला सुरुवात केली. यामध्ये मुख्य ५० रस्त्यांसह ११० प्रमुख चौकांचा समावेश आहे. कंपनीकडून संबंधित पथदिव्यांची पाच वर्षांपर्यंत देखभाल दुरुस्ती केली जाणार आहे. दीड वर्षांच्या कालावधीत कंपनीने ७४ टक्के काम पूर्ण केल्याचा दावा प्रशासनाकडून होत आहे.

 

Web Title: 74 percent of LED's work done; Still the problem of darkness persists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.