अकोला जिल्ह्यातील ७५ टक्के विद्यार्थी भागाकारात ‘ढ’ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 12:26 PM2018-10-01T12:26:36+5:302018-10-01T12:31:42+5:30

अकोला : चाचणीच्या पहिल्या टप्प्यात ७५ टक्के विद्यार्थी भागाकारात ‘ढ’ असल्याचे दिसून आले आहे, तर ७६ टक्के विद्यार्थ्यांना उतारा वाचन, समजपूर्वक वाचन येत नसल्याचे या चाचणीतून उघड झाले.

75 percent students of Akola district dont know division | अकोला जिल्ह्यातील ७५ टक्के विद्यार्थी भागाकारात ‘ढ’ 

अकोला जिल्ह्यातील ७५ टक्के विद्यार्थी भागाकारात ‘ढ’ 

googlenewsNext
ठळक मुद्देदुसरी ते आठवीतील २५.५८ टक्केच विद्यार्थ्यांनाच भागाकार येत असल्याचे दिसून आले.एवढेच नाही, तर गणितासोबतच विद्यार्थी वाचनातही कच्चे असल्याचे दिसून आले. केवळ २४.१७ टक्के विद्यार्थ्यांनाच वाचन येते. उर्वरित ७५.८३ टक्के विद्यार्थ्यांना साधे वाचताही येत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

- नितीन गव्हाळे
अकोला : शालेय विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीस लागण्यासाठी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेने जिल्ह्यातील इयत्ता दुसरी ते आठवीतील विद्यार्थ्यांची २८ ते ३१ आॅगस्ट या कालावधीत शालेय स्तरावर पायाभूत चाचणी घेतली होती. चाचणीच्या पहिल्या टप्प्यात ७५ टक्के विद्यार्थी भागाकारात ‘ढ’ असल्याचे दिसून आले आहे, तर ७६ टक्के विद्यार्थ्यांना उतारा वाचन, समजपूर्वक वाचन येत नसल्याचे या चाचणीतून उघड झाले आहे; परंतु अंतिम फेरीपर्यंत विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिक्षण विभागाला दिलेल्या ‘केआरए’नुसार देशपातळीवर मूल्यमापनात महाराष्ट्राचा प्रथम तीन क्रमांकामध्ये समावेश करण्याचे टार्गेट दिले आहे. त्यानुसार यंदा अध्ययन निष्पत्तीवर आधारित पायाभूत चाचणी ही राज्य मंडळाशी संलग्न शाळांमधील इयत्ता दुसरी ते आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आली. या चाचणीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची प्रगती किती झाली, विद्यार्थी कोणत्या अध्ययन निष्पत्तीमध्ये कमी पडतो आहे, हे तपासण्यात येत आहे. जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेच्या माध्यमातून प्राथमिक शाळांमध्ये घेण्यात आलेल्या पायाभूत चाचणीच्या पहिल्या टप्यात इयत्ता दुसरी ते आठवीतील २५.५८ टक्केच विद्यार्थ्यांनाच भागाकार येत असल्याचे दिसून आले. यावरून ७५ टक्के विद्यार्थ्यांना अद्यापही भागाकार येत नसल्याचे वास्तव या चाचणीतून समोर आले आहे. एवढेच नाही, तर गणितासोबतच विद्यार्थी वाचनातही कच्चे असल्याचे दिसून आले. केवळ २४.१७ टक्के विद्यार्थ्यांनाच वाचन येते. उर्वरित ७५.८३ टक्के विद्यार्थ्यांना साधे वाचताही येत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

गतवर्षीच्या तुलनेत यंदाची कामगिरी सुमार!
गतवर्षी घेण्यात आलेल्या पायाभूत चाचणीमध्ये पहिल्या टप्प्यात दुसरी ते आठवीतील ३५ टक्के विद्यार्थ्यांना भागाकार येत होता आणि ३४ टक्के विद्यार्थ्यांना वाचता येत होते. अंतिम टप्प्यात त्यात सुधारणा होऊन ६९.५८ विद्यार्थ्यांना भागाकाराचे गणित जुळविता आले आणि ६५.७३ टक्के विद्यार्थ्यांना वाचता आले.

पायाभूत चाचणीतून विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर समजतो. त्याला गणित, वाचन येते की नाही, ज्यांना भागाकार, वजाबाकी, गुणाकारासोबतच उतारा वाचन, समजपूर्वक वाचन येत नाही, अशा विद्यार्थ्यांकडे प्रकर्षाने लक्ष देऊन त्याच्या गुणवत्ता वाढीसाठी विशेष प्रयत्न केले जातात. यासाठी शिक्षकांनी प्रामाणिकपणे काम करण्याची गरज आहे.
-डॉ. राम सोनारे, अधिव्याख्याता,
जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था.

 

Web Title: 75 percent students of Akola district dont know division

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.