शिर्ला गावचे ७५ सैनिक देशसेवेसाठी संरक्षण दलात, गावाला मिळाली वेगळी ओळख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:18 AM2021-07-26T04:18:53+5:302021-07-26T04:18:53+5:30
संतोषकुमार गवई शिर्ला : अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील शिर्ला गावचे ७५ हून अधिक एक सैनिक भारताच्या संरक्षण दलात विविध ...
संतोषकुमार गवई
शिर्ला : अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील शिर्ला गावचे ७५ हून अधिक एक सैनिक भारताच्या संरक्षण दलात विविध पदांवर डोळ्यात तेल घालून यशस्वीपणे जबाबदारी पार पाडत आहेत त्याबरोबरच भारत-पाकिस्तानच्या आतापर्यंत झालेल्या सर्व लढाई आणि अतिरेकीविरोधी कारवायात यशस्वी सहभाग नोंदवला आहे. यामध्ये सैनिक कैलास निमकंडे शहीद झाला.
भारत स्वतंत्र झाल्यानंतर पाकिस्तानविरुद्ध अनेक वेळा विविध मोठ्या लढाया देशाला लढाव्या लागल्या त्यामध्ये शिर्ला गावचे सैनिक प्रामुख्याने सहभागी होते. अलीकडच्या कारगिल युद्धातही आपला सहभाग नोंदवला.
२० मे २००५ रोजी जम्मू-काश्मीरच्या राजुरी सेक्टरमधील कालाकोट चौकीवर निकराची लढत देत ५ पाकिस्तानी अतिरेक्यांना यमसदनी पाठविण्यात सैनिक कैलास काशीराम निमकंडे यशस्वी झाला मात्र यामध्ये तो शहीद झाला. गावच्या सैनिकांना ऊर्जा मिळावी यासाठी भलेमोठे स्मारक शहीद कैलास निमकंडे यांच्या नावाने शिर्ला गावात उभारले गेले आहे. शहीद कैलास देशासाठी लढून शहीद झाल्यानंतरही त्याचा चुलत भाऊ उमेश देवीदास निमकडे हा सध्या उपरोक्त ठिकाणी आपली सेवा देत आहे. शहीद कैलासचा सख्खा भाऊ विलास निमकंडे पुण्याच्या खडकवासला येथील डिफेन्स सिक्युरिटी कोरमध्ये आपली सेवा देत आहे.
जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये राष्ट्रीय रायफलचे तत्कालीन सैनिक हर्षल रामकृष्ण खंडारे यांनी शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्यासोबत सन २०१६ मध्ये एका मोहिमेमध्ये यशस्वी जबाबदारी पार पडली होती.
सध्या भारताच्या संरक्षण दलाच्या विविध विभागांमध्ये शिरल्याचे ७५ हून अधिक आपली सेवा बजावत आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप पुणेचे सुभेदार श्रीकृष्ण तानाजी खरडे, उमेश प्रल्हाद अळसकार, ज्ञानेश्वर नामदेव खराडे, विष्णू महादेव वसतकार, मराठा इन्फंट्रीचे रघुनाथ जयराम कठाळे, उमेश देवीदास निमकंडे, सुदर्शन देवनाथ बगाडे, हर्षल रामकृष्ण खंडारे, इलेक्ट्रिक मेकॅनिकल ग्रुपचे नीलेश प्रल्हाद अळसकार, बीएसएफचे हेड कॉन्स्टेबल रवींद्र भास्कर गावंडे, मंगेश जगन्नाथ राऊत, दिनकर यल्लाप्पा खर्डे, सीआरपीएफचे हेडकॉन्स्टेबल संजय मधुकर रौंदळे, सुभाष नारायण बळकार, महार रेजिमेंटचे अमोल रवींद्र इंगळे, साहेबराव गवई, इंडो तिबेट पोलीस वीरेंद्र निरंजन गवई, सिध्दार्थ उगले यांच्यासह शिर्ला गावातील अनेक जण भारतातील देशाच्या चारही बाजूंच्या सीमेवर त्याबरोबरच संरक्षण दलातील अनेक ठिकाणी आपली सेवा बजावत आहेत.
मे- जुलैदरम्यान सन १९९९ मध्ये जम्मू-काश्मीरच्या कारगिल जिल्ह्यात लष्करी संघर्ष झाला होता तेव्हा कारगिल युद्धात शेकडो पाकिस्तानी सैनिकांना यमसदनी पाठवून भारताची जमीन पाकिस्तानला हस्तगत करता आली नाही. यात शिर्लासह भारतातील सैनिकांची जी अनमोल कामगिरी यशस्वीपणे पार पाडली आहे त्या ऑपरेशन विजयमधील सैनिकांना सलामी!