जिल्ह्यात वर्षभरात ७७२ जणांना सर्पदंश!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:18 AM2020-12-29T04:18:22+5:302020-12-29T04:18:22+5:30
जिल्ह्यात सर्पदंशाच्या बहुतांश घटना प्रामुख्याने शेतीकामाच्या वेळी घडल्याचे निदर्शनास येते. प्रामुख्याने पावसाळ्यात शेतात पेरणीला सुरुवात झाल्यानंतर सर्पदंशाच्या घटनांमध्ये वाढ ...
जिल्ह्यात सर्पदंशाच्या बहुतांश घटना प्रामुख्याने शेतीकामाच्या वेळी घडल्याचे निदर्शनास येते. प्रामुख्याने पावसाळ्यात शेतात पेरणीला सुरुवात झाल्यानंतर सर्पदंशाच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येते. मागील वर्षभरात ७७२ लाेकांना सर्पदंश झाल्याच्या घटना घडल्या. यातील एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. या तुलनेत २०१९ मध्ये हे प्रमाण कमी असून, वर्षभरात ७४४ जणांना सर्पदंश झाल्याची नोंद आहे. यामध्ये ५४८ पुरुष, तर १९६ महिलांचा समावेश आहे. २०१९ मध्ये देखील एका व्यक्तीचा सर्पदंशाने मृत्यू झाला होता.
साप चावल्याचे बळी
२०१९ - १
२०२० - १
जिल्ह्यात लसींचा उपलब्ध साठा
सर्वोपचार रुग्णालयासह ग्रामीण रुग्णालयात सर्पदंशासाठी लसींचा साठा मुबलक आहे. सर्पदंश झालेल्या व्यक्तीला वेळेवर लस उपलब्ध झाल्याने त्यांचा जीव वाचला आहे.
जिल्ह्यात आढळणारे साप
जिल्ह्यात प्रामुख्याने नाग, घोणस, मण्यार, फुरसे हे विषारी साप आढळतात. यासोबतच मांजऱ्या, चिलाटी हे अर्धविषारी साप, तर धामण, अजगर, फुकरी, नानेटी हे बिनविषारी साप आढळतात. याव्यतिरिक्तही सापाच्या विविध प्रजाती जिल्ह्यात आढळून येतात.
साप चावताच काय काळजी घ्यावी
साप चावल्यानंतर सर्वप्रथम दवाखान्यात जावे. ज्या व्यक्तीला साप चावला, त्याला ४८ तास झोपू देऊ नये, त्याला बसवूनच ठेवावे. पायाला चावल्यास पाय खालीच ठेवावा, तर हाताला चावल्यास हात देखील खालीच ठेवावा. दवाखान्यात नेण्यास उशीर होत असल्यास साप चावल्याच्या ठिकाणी एक इंचापर्यंत उभे ब्लेड मारणे. शक्यतोवर हा पर्याय टाळलेला बरा, पण पर्याय नसल्यास हा मार्ग निवडावा, अशी माहिती सर्पमित्र अमाेल नवले यांनी दिली.