महावितरणच्या ८० टक्के कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:23 PM2021-06-28T16:23:43+5:302021-06-28T16:26:40+5:30
80% MSEDCL employees vaccinated : यामध्ये ५९ हजार ७९९ नियमित व बाह्यस्त्रोत कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
अकोला: महावितरणने कोविड प्रतिबंधक लसीकरणाला वेग दिला असून आतापर्यंत एकूण ७९.४ टक्के कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. यामध्ये ५९ हजार ७९९ नियमित व बाह्यस्त्रोत कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. येत्या पंधरवड्यात उर्वरित सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करण्याचे निर्देश महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिले आहेत.
गेल्या दीड वर्षांपासून कोरोना प्रादुर्भावामध्ये सुरळीत वीजपुरवठ्यासाठी अहोरात्र व अविश्रांत वीजसेवा देणाऱ्या महावितरणच्या नियमित व बाह्यस्त्रोत कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यासाठी महावितरणच्या व्यवस्थापनाकडून विशेष प्रयत्न सुरु आहेत. आतापर्यंत ३४ जिल्ह्यांमध्ये वीज कर्मचाऱ्यांना फ्रंटलाईन वर्कर्सप्रमाणे दर्जा देण्यात आला आहे. त्याचा लसीकरणासाठी मोठा फायदा झाला आहे.
महावितरणमध्ये कार्यरत ७५ हजार ३२३ पैकी आतापर्यंत ५९ हजार ७९९ (७९.४ टक्के) नियमित व बाह्यस्त्रोत कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहेत.
बारामती परिमंडळ आघाडीवर
सर्वाधिक बारामती परिमंडलात ९१.२ टक्के तर पुणे व कोल्हापूर- ८७.८४ टक्के, कल्याण- ८५.९ टक्के, औरंगाबाद- ८४.१ टक्के, कोकण- ८२.२ टक्के, भांडूप- ८१.५ टक्के, नांदेड- ८०.९ टक्के, जळगाव- ८०.२ टक्के, अमरावती- ७७.९ टक्के, नागपूर- ७४ टक्के, अकोला- ७३.२ टक्के, नाशिक- ७३.५ टक्के, चंद्रपूर- ७१.५ टक्के, गोदिंया- ७०.४ टक्के आणि लातूर परिमंडलामध्ये ६५.९ टक्के कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. उर्वरित कर्मचाऱ्यांच्या लसीकरणासाठी स्थानिक कार्यालयांकडून पाठपुरावा करण्यात येत आहे.