कापशी, शिवर तलावातून ८० हजार घनमीटर गाळाचा उपसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 01:31 PM2019-06-10T13:31:28+5:302019-06-10T13:34:15+5:30
कापशी आणि शिवर तलावातून आतापर्यंत ८० हजार घनमीटर गाळाचा उपसा करण्यात आला.
अकोला: भारतीय जैन संघटना आणि महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने अकोला जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या सुजलाम्-सुफलाम् प्रकल्पांतर्गत कापशी आणि शिवर तलावातून आतापर्यंत ८० हजार घनमीटर गाळाचा उपसा करण्यात आला असून, या दोन तलावांमध्ये आठ कोटी लीटर अतिरिक्त पाणी साठवणूक क्षमता निर्माण झाली आहे, अशी माहिती सुजलाम्-सुफलाम् प्रकल्पाचे जिल्हा प्रमुख प्रा. सुभाष गादिया यांनी दिली आहे.
कापशी तलावात २७ एप्रिलपासून ५ जेसीबी मशीन आणि शिवर तलावात ६ फेब्रुवारीपासून दोन जेसीबी मशीन सुरू असून, या मशीनसाठी राज्य सरकार डीझल उपलब्ध करून देत आहे.
कापशी तलावातील पाच जेसीबीने ११०२ तास काम केले असून, ५८५४७ घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. हा गाळ ८० शेतकऱ्यांनी आपल्या १८० एकर शेतात टाकला असून, यासाठी ट्रॅक्टरच्या १५५८५ फेºया झाल्या आहेत. गाळ काढल्यामुळे कापशी तलावात ५ कोटी ५० लाख लीटर अतिरिक्त पाणी साठवणूक क्षमतेची वाढ झाली आहे.
शिवर तलावातून दोन जेसीबीद्वारे २५१३० घनमीटर गाळ काढण्यात आला असून, मशीन ७१८ तास चालल्या आहेत. गाळ काढल्यामुळे या तलावात २ कोटी ५० लाख लीटर अतिरिक्त पाणी साठवणूक क्षमता निर्माण झाली आहे.
महापौर विजय अग्रवाल, आयुक्त संजय कापडणीस, उपविभागीय अधिकारी अपार, कार्यकारी अभियंता ताठे, नगरसेवक अनिल मुरूमकार, सुनीता अग्रवाल व सुजाता अहिर यांच्या पुढाकाराने कापशी आणि शिवर तलावातील गाळ काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. यासाठी भारतीय जैन संघटनेचे जिल्हा प्रमुख प्रा. सुभाष गादिया, सुजलाम्-सुफलाम् प्रकल्प जिल्हा व्यवस्थापक नितीन राजवैद्य, पर्यवेक्षक श्रीकांत पोफळकर, राहुल सपकाळ, तालुका समन्वयक संतोष सिरसाट, नजिया खान, कापशीचे सरपंच अंबादास उमाळे, अकोला महानगरपालिका कर्मचारी व वाहन चालक यांनी परिश्रम घेतले.
जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, नोडल अधिकारी मनोज लोणारकर, जिल्हा समिती सचिव व जिल्हा जलसंधारण अधिकारी श्यामकांत बोकये यांच्या नेतृत्वाखाली सुजलाम्-सुफलाम् अकोला प्रकल्पाची कामे प्रगतिपथावर आहेत.