हमीपत्रात अडकले ८२ हजार गरिबांचे रॉकेल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 12:54 PM2018-12-31T12:54:13+5:302018-12-31T12:55:45+5:30

अकोला: सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत कुटुंबात एकही गॅस सिलिंडर नसल्याचे हमीपत्र सादर न करणाऱ्या जिल्ह्यातील बिगरगॅस शिधापत्रिकाधारकांना गत तीन महिन्यांपासून रॉकेलचे वितरण बंद करण्यात आले आहे.

  82 thousand poor people not get kerosine in akola district |  हमीपत्रात अडकले ८२ हजार गरिबांचे रॉकेल!

 हमीपत्रात अडकले ८२ हजार गरिबांचे रॉकेल!

Next

- संतोष येलकर

अकोला: सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत कुटुंबात एकही गॅस सिलिंडर नसल्याचे हमीपत्र सादर न करणाऱ्या जिल्ह्यातील बिगरगॅस शिधापत्रिकाधारकांना गत तीन महिन्यांपासून रॉकेलचे वितरण बंद करण्यात आले आहे. त्यामुळे गॅस सिलिंडर नसलेल्या जिल्ह्यातील ८२ हजार ३०१ गरीब शिधापत्रिकाधारकांचे रॉकेल हमीपत्रात अडकले आहे.
सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत रॉकेल वितरण करताना, लाभार्थी शिधापत्रिकाधारकांच्या नावे अथवा कुटुंबातील कोणत्याही सदस्यांच्या नावे गॅस जोडणी नसल्याचे घोषणापत्र (हमीपत्र) घेतल्याशिवाय रॉकेलचे वितरण करण्यात येणार नाही, असे परिपत्रक शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत १ आॅगस्ट २०१८ रोजी काढण्यात आले. त्यानुसार जिल्ह्यात गॅस सिलिंडर नसल्याचे हमीपत्र सादर न करणाºया शिधापत्रिकाधारक गरीब कुटुंबांना रॉकेलचे वितरण बंद करण्यात आले. जिल्ह्यात १ लाख २४ हजार ३५१ बिगरगॅस शिधापत्रिकाधारक असून, त्यापैकी २८ डिसेंबरपर्यंत ४२ हजार ५० शिधापत्रिकाधारकांनी कुटुंबात एकही गॅस सिलिंडर नसल्याचे हमीपत्र संबंधित रास्तभाव दुकानदारांकडे सादर केले. उर्वरित ८२ हजार ३०१ शिधापत्रिकाधारकांकडून अद्याप हमीपत्र सादर करण्यात आले नाही. जिल्हा पुरवठा विभागामार्फत हमीपत्र सादर न करणाºया जिल्ह्यातील बिरगॅस शिधापत्रिकाधारकांना दरमहा वितरित करण्यात येणारे रॉकेल गत आॅक्टोबरपासून बंद करण्यात आले. गॅस सिलिंडर नसल्याचे हमीपत्र घेण्याच्या या प्रक्रियेत जिल्ह्यातील गॅस सिलिंडर नसलेल्या गरीब शिधापत्रिकाधारकांना तीन महिन्यांपासून रॉकेलच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे. जिल्ह्यातील ८२ हजार ३०१ शिधापत्रिकाधारकांनी अद्याप हमीपत्र सादर केले नसल्याने, त्यांच्या रॉकेल वितरणाची प्रक्रिया रखडली आहे.

जिल्ह्यात गॅस सिलिंडर नसलेले असे आहेत शिधापत्रिकाधारक!
तालुका                               शिधापत्रिकाधारक
अकोला शहर                           २३,९१९
अकोला ग्रामीण                     १०,०१४
अकोट                                   १५,९५६
तेल्हारा                                 १२,११६
बाळापूर                                १७,२५५
पातूर                                    ११,६१८
बार्शीटाकळी                          १३,३३९
मूर्तिजापूर                              २०,२३४
......................................................
एकूण                                    १,२४,३५१

४२ हजार शिधापत्रिकाधारकांनी सादर केले हमीपत्र!
जिल्ह्यात गॅस सिलिंडर नसलेल्या १ लाख २४ हजार ३५१ शिधापत्रिकाधारकांपैकी २८ डिसेंबरपर्यंत ४२ हजार ५० शिधापत्रिकाधारकांनी कुटुंबात एकही सिलिंडर नसल्याचे हमीपत्र रास्तभाव दुकानदारांमार्फत पुरवठा विभागाकडे सादर केले आहे. उर्वरित ८२ हजारावर शिधापत्रिकाधारकांनी अद्याप हमीपत्र सादर केले नाही.

 

Web Title:   82 thousand poor people not get kerosine in akola district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Akolaअकोला