८२0 खासगी शाळांचा ‘बंद’!
By admin | Published: July 5, 2016 01:25 AM2016-07-05T01:25:26+5:302016-07-05T01:25:26+5:30
शिक्षण बचाव कृती समितीचे आंदोलन
अकोला: महाराष्ट्र राज्य शिक्षण बचाव कृती समिती अंतर्गत जिल्ह्यातील खासगी अनुदानित व विनाअनुदानित शिक्षण संस्थांच्यावतीने सोमवारी बंद पाळण्यात आला. या आंदोलनात जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक ८२0 शाळा बंद ठेवण्यात आल्या. खासगी शाळांमध्ये गणित, मराठी व इंग्रजी विषयांच्या शिक्षकांची बंद करण्यात आलेली भरती सुरू करण्यात यावी, खासगी शाळांना इमारत भाडे देण्यात यावे, २५ टक्के राखीव जागांवर शाळा प्रवेश देणार्या शाळांना परतावा देण्यात यावा, खासगी शिक्षण संस्थांची स्वायत्तता कायम राखण्यात यावी, सन २00४-0५ पासून वेतनेत्तर अनुदानाची थकबाकी देण्यात यावी या व इतर मागण्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षण बचाव कृती समितीच्यावतीने ४ जुलै रोजी एक दिवसीय बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्या अंतर्गत जिल्हा कृती समितीच्यावतीने पाळण्यात आलेल्या बंदमध्ये जिल्ह्यातील खासगी अनुदानित व विनाअनुदानित शाळा -महाविद्यालयांचे मुख्याध्यापक, शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, चतुर्थ श्रेणी कर्मचारी सहभागी झाले होते. या आंदोलनात जिल्ह्यातील खासगी शाळा सोमवारी बंद ठेवण्यात आल्या. त्यामध्ये जिल्ह्यात ५0४ प्राथमिक आणि ३१६ माध्यमिक अशा एकूण ८२0 खासगी शाळा बंद ठेवण्यात आल्या. त्यामुळे अकोला शहरासह जिल्ह्यातील विविध भागात खासगी शाळा बंद असल्याचे चित्र होते. सोमवारी दिवसभर शाळा बंद ठेवण्यात आल्याने, विद्यार्थ्यांचे मात्र शैक्षणिक नुकसान झाले.