८२१ रास्त भाव दुकानांमध्ये लागल्या ‘ई-पॉस’ मशीन!
By admin | Published: April 20, 2017 01:47 AM2017-04-20T01:47:18+5:302017-04-20T01:47:18+5:30
बायोमेट्रिक पद्धतीने होणार धान्य वितरण
अकोला : सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत शिधापत्रिकाधारकांना ‘बायोमेट्रिक’ पद्धतीने धान्य वितरित करण्यासाठी जिल्ह्यातील १ हजार ५२ रास्त भाव दुकानांमध्ये ‘ई-पॉस’ मशीन लावण्याचे काम पुरवठा विभागामार्फत सुरू असून, त्यापैकी ८२१ रास्त भाव दुकानांमध्ये ‘ई-पॉस’ मशीन लावण्याचे काम बुधवारपर्यंत पूर्ण करण्यात आले आहे.
सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेत समाविष्ट प्राधान्य गटातील लाभार्थी शिधापत्रिकाधारक आणि अंत्योदय योजनेतील लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना दरमहा रास्त भाव दुकानांमध्ये धान्य वितरित करण्यात येते. राज्यातील शिधापत्रिकाधारकांना ‘बायोमेट्रिक’ पद्धतीने धान्य वितरित करण्याचा निर्णय शासनामार्फत घेण्यात आला आहे. बायोमेट्रिक पद्धतीने धान्य वितरित करण्यासाठी रास्त भाव दुकानांमध्ये ‘ई-पॉस’ मशीन लावण्याची प्रक्रिया पुरवठा विभागामार्फत सुरू करण्यात आली आहे. त्यामध्ये अकोला जिल्ह्यातील सातही तालुक्यांतील १ हजार ५२ रास्त भाव दुकानांमध्ये ‘ई-पॉस’ मशीन लावण्यासाठी १ हजार ७० ई-पॉस मशीन प्राप्त झाल्या आहेत. प्राप्त झालेल्या पॉस मशीन रास्त भाव दुकानांमध्ये लावण्याचे काम जिल्हा पुरवठा विभागामार्फत सुरू करण्यात आले आहे.
त्यामध्ये १९ एप्रिलपर्यंत जिल्ह्यात ८२१ रास्त भाव दुकानांमध्ये ‘ई-पॉस ’मशीन लावण्याचे काम पूर्ण करण्यात आले असून, उर्वरित २३१ रास्त भाव दुकानांमध्ये ‘ई-पॉस’ मशीन लावण्याचे काम सुरू आहे.
ई-पॉस मशीन लावण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर रास्त भाव दुकानांमध्ये बायोमेट्रिक पद्धतीने शिधापत्रिकाधारकांना धान्य वितरित करण्यासाठी ‘ई-पॉस’ मशीनचा वापर सुरू करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील १ हजार ५२ रास्त भाव दुकानांमध्ये ‘ई-पॉस’ मशीन लावण्याचे काम सुरू असून, १९ एप्रिलपर्यंत जिल्ह्यात ८२१ रास्त भाव दुकानांमध्ये ‘ई-पॉस’ मशीन लावण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. उर्वरित २३१ दुकानांमध्ये पॉस मशीन लावण्याचे काम लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे.
-अनिल टाकसाळे, जिल्हा पुरवठा अधिकारी.