अकोला जिल्ह्यातील ८३ गुन्हेगार दोन दिवसांसाठी तडीपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2019 02:55 PM2019-06-04T14:55:34+5:302019-06-04T14:55:39+5:30
जिल्ह्यातील ८३ गुन्हेगारांना ४ ते ६ जून या दोन दिवसांसाठी तडीपार करण्यात आले आहे.
अकोला: मुस्लीम बांधवांचा पवित्र सण ईद मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असून, या दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने विविध उपाययोजना केल्या असून, त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील ८३ गुन्हेगारांना ४ ते ६ जून या दोन दिवसांसाठी तडीपार करण्यात आले आहे. उपविभागीय अधिकारी डॉ. नीलेश अपार यांनी हा आदेश सोमवारी दिला.
येत्या ५ जून रोजी मुस्लीम बांधवांतर्फे ईद हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. सदर उत्सव शांततेत पार पाडण्याच्या दृष्टीने व उत्सवाच्या काळात अकोला तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी तालुक्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये गंभीर गुन्हे दाखल असलेले ८३ गुन्हेगार ४ जून ते ६ जून या कालावधीत अकोला तालुक्यातून हद्दपार करण्यात आले आहेत. यामध्ये अकोट फैल पोलीस स्टेशन अंतर्गत १२, जुने शहर पोलीस स्टेशन अंतर्गत २६, एमआयडीसी पोलीस स्टेशन अंतर्गत १४, डाबकी रोड पोलीस स्टेशन अंतर्गत १४, खदान पोलीस स्टेशन अंतर्गत १६ व सिटी कोतवाली पोलीस स्टेशन अंतर्गत १ अशा एकूण ८३ गुन्हेगारांना दोन दिवसांसाठी तडीपार करण्यात आले आहे.