८४ खेडी योजना मजीप्रा ३० जूनपर्यंतच चालवणार!
By admin | Published: June 6, 2017 12:57 AM2017-06-06T00:57:06+5:302017-06-06T00:57:06+5:30
जिल्हा परिषद करणार सर्वसाधारण सभेत चर्चा
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: चार तालुक्यातील विशेषत: खारपाणपट्ट्यातील ८८ गावांची तहान भागवणारी ८४ खेडी पाणीपुरवठा योजनेतून पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ३० जून रोजी झटकणार आहे. त्यामुळे योजनेचे करायचे काय, या मुद्यावर आता १४ जून रोजीच्या सर्वसाधारण सभेत चर्चा होणार आहे. त्यासाठी संयुक्त पथकाने आधीच योजनेतील गावांना भेटी देऊन सद्यस्थितीचा अहवाल तयार केला आहे.
८४ खेडी योजनेतून अकोट, अकोला, तेल्हारा तालुक्यातील ७९ गावांना पाणीपुरवठा सुरू आहे. गेल्यावर्षी २०१५-१६ च्या टंचाईमध्ये योजनेला निधी मंजूर करतानाच तो हस्तांतरित करण्याचेही शासनाने बजावले. त्यावेळी १० कोटी २० लाख ७० हजार रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली. टंचाई काळातील कामे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पूर्ण केल्यानंतर योजनेची देखभाल व दुरुस्ती, योजना व्यवस्थापन जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित करण्याचे आदेशात नमूद होते.
टंचाईतील विशेष दुरुस्तीची कामे ३१ मार्च २०१७ रोजी पूर्ण झाली. शासनाच्या आदेशानुसार, ही योजना हस्तांतरित करण्यासाठी जीवन प्राधिकरणाने जिल्हा परिषदेला १६ मार्च २०१७ रोजी पत्र दिले. त्यामध्ये १ एप्रिलपासून योजना हस्तांतरित करून घेण्याचे कळवण्यात आले. ३१ मार्च रोजी पाणीपुरवठ्याचे काम बंद करत असताना तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी विधळे यांनी बैठक घेत काही दिवस योजना चालवण्याचा प्रस्ताव दिला.
त्यानुसार ३० जूनपर्यंत योजना चालवण्याचे ठरले. त्यावर जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे यांनीही संबंधित गावातील सरपंच, ग्रामसेवक, पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची ६ एप्रिल रोजी बैठक घेत उपाय करण्याचे सुचवले. त्यावेळी अकोटचे उपअभियंता किशोर ढवळे यांनी संयुक्त पाहणी करून अहवाल तयार करण्याचे ठरले. हा अहवाल शासनाकडेही सादर केला जाणार आहे. त्यापूर्वी त्यावर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे.
योजनेवर अवलंबून असलेली गावे
८४ खेडी प्रादेशिक योजनेमध्ये सर्वाधिक गावे खारपाणपट्ट्यातील आहेत. त्यामध्ये अकोट तालुक्यातील लोहारी बुद्रुक, लोहारी खुर्द, मुंडगाव, लामकाणी, तांदूळवाडी, सोनबर्डी, आलेगाव, पिंप्री डिक्कर, देवरी, पाटसुल, वारुळा, वणी, बळेगाव, आलेवाडी, पळसोद, देवर्डा, पारळा, टाकळी खुर्द, निजामपूर, चोहोट्टाबाजार, करोडी, किनखेड, करतवाडी, पिलकवाडी, नखेगाव, राजूरवाडी, टाकळी बुद्रुक, नांदखेड, आगासखेड, सालखेड, धामणा बुद्रुक, कालवाडी, खापरवाडी बुद्रुक, खापरवाडी खुर्द, वरूर जऊळका, लोतखेड, दिनोडा, मरोडा, कावसा खुर्द, कावसा बुद्रुक, देऊळगाव, तरोडा, रेल, धारेल, गिरजापूर, पनोरी, दनोरी, केळीवेळी, जऊळखेड बुद्रुक, जऊळखेड खुर्द, धनकवाडी, ढगा, करतवाडी, कवठा खुर्द, कवठा बुद्रुक, सावरगाव, विटाळी, रौंदळा हिलालाबाद, हनवाडी, सांगवी, ठोकबर्डी, पुंडा, बांबर्डा, रोहनखेड, तेल्हारा तालुक्यातील नेर, पिवंदळ, गरसोळी, पातोंडा, अकोला तालुक्यातील दहीहांडा, वडद खुर्द, रोहणा, ब्रह्मपुरी, काटी-पाटी.