‘आपले सरकार सेवा केंद्रां’च्या निवड यादीवर ८४ आक्षेप दाखल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:25 AM2021-09-16T04:25:24+5:302021-09-16T04:25:24+5:30
अकोला : जिल्ह्यातील रिक्त ‘आपले सरकार सेवा केंद्रां’साठी जिल्हा सेतू समितीमार्फत जाहीर करण्यात आलेल्या ३४५ उमेदवारांच्या अंतिम निवड यादीवर ...
अकोला : जिल्ह्यातील रिक्त ‘आपले सरकार सेवा केंद्रां’साठी जिल्हा सेतू समितीमार्फत जाहीर करण्यात आलेल्या ३४५ उमेदवारांच्या अंतिम निवड यादीवर १५ सप्टेंबर रोजी एकाच दिवसात ८४ आक्षेप जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दाखल करण्यात आले.
जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपालिका आणि ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात रिक्त असलेल्या आपले सरकार सेवा केंद्रांसाठी जिल्हा सेतू समिती तथा जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार प्राप्त झालेल्या एक हजार ५३२ अर्जांमधून आपले सरकार सेवा केंद्रांसाठी ३४५ पात्र उमेदवारांची अंतिम निवड यादी जिल्हा सेतू समितीमार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली होती. त्यामध्ये दिव्यांग ८९, एकमेव अर्ज असलेले ४७, एकमेव सीएससीधारक ६५ आणि सीएससीचे व्यवहार जास्त असलेल्या १४४ उमेदवारांचा समावेश आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या आदेशानुसार जाहीर करण्यात आलेल्या निवड यादीवर १५ सप्टेंबर सायंकाळी ६ वाजेपर्यंत तक्रारी, आक्षेप व निवेदने मागविण्यात आली. त्यानुसार एकाच दिवशी (दि. १५ सप्टेंबर) रोजी आपले सरकार सेवा केंद्रांसाठी जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारांच्या निवड यादीवर ८४ आक्षेप - तक्रार अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दाखल करण्यात आले.
.......…...
आपले सरकार सेवा केंद्रांसाठी जाहीर केलेल्या उमेदवारांच्या निवड यादीसंदर्भात ८४ आक्षेप- तक्रार अर्ज प्राप्त झाले असून, आक्षेप तक्रार अर्जाचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात येणार आहे.
- संजय खडसे
निवासी उपजिल्हाधिकारी तथा सचिव जिल्हा सेतू समिती, अकोला