चार महिन्यात ८४ गर्भवती कोरोना पॉझिटिव्ह!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2020 11:21 AM2020-08-21T11:21:33+5:302020-08-21T11:21:45+5:30
आवश्यक प्रतिबंधात्मक उपयायोजना केल्यामुळे जिल्ह्यात गत चार महिन्यात केवळ ८४ गर्भवती पॉझिटिव्ह आल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव थांबता थांबत नसताना गर्भवतींसह बाळंतिणीही कोरोना पॉझिटिव्ह येऊ लागल्याने आरोग्य यंत्रणेसमोरील आव्हाने वाढली होती; मात्र योग्य वेळी आवश्यक प्रतिबंधात्मक उपयायोजना केल्यामुळे जिल्ह्यात गत चार महिन्यात केवळ ८४ गर्भवती पॉझिटिव्ह आल्या आहेत.
जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर कंटेनमेन्ट झोनमधील गर्भवतीसह बाळंतिणींचेही अहवाल कोरोना पॉझिटिव्ह येऊ लागले होते. अशा परिस्थितीत नवजात शिशूंनाही कोरोनाचा मोठ्या प्रमाणात धोका संभवण्याची चिंता आरोग्य विभागाला लागली होती. त्यामुळे जिल्हा स्त्री रुग्णालयात दाखल होणाऱ्या गर्भवतींची तपासणी केल्या जाऊ लागली.
तपासणीचा वेग वाढल्यामुळे योग्य वेळेत गर्भवतींमध्ये कोरोनाचे निदान शक्य झाले. गत चार महिन्यात जिल्हा स्त्री रुग्णालयात तब्बल १,६५८ गर्भवतींचे नमुने घेऊन कोरोनाची चाचणी करण्यात आली. यापैकी ८४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यामध्ये ७१८ रॅपिड अॅन्टिजन टेस्ट, तर ९६० आरटीपीसीआर चाचण्यांचा समावेश आहे. पॉझिटिव्ह आल्याने या सर्व रुग्णांना प्रसूती आणि पुढील उपचारासाठी सर्वोपचार रुग्णालयात हलविण्यात आले.
एकाही शिशूला कोरोनाची लागण नाही
नवजात शिशूंना कोरोनाची लागण होऊ नये यासाठी जिल्हा स्त्री रुग्णालयासह जीएमसीमध्येही विशेष खबरदारी घेण्यात आली. जिल्ह्यात आतापर्यंत ८४ गर्भवती कोरोना पॉझिटिव्ह असल्याची नोंद असली, तरी एकाही नवजात शिशूला कोरोनाची लागण झाली नाही.
अशी घेण्यात आली विशेष खबरदारी
जिल्हा स्त्री रुग्णालयात जिल्ह्यातीलच नव्हे, तर शेजारील जिल्ह्यातील गर्भवतीदेखील प्रसूतीसाठी मोठ्या संख्येने येतात. अशा परिस्थितीत कोरोनाचा धोका टाळण्यासाठी प्रतिबंधित क्षेत्रातून येणाºया गर्भवतींसाठी स्वतंत्र वॉर्डाची निर्मिती करण्यात आली आहे. शिवाय, प्रत्येक गर्भवतींचे स्क्रीनिंग केले जात आहे.
अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे कळताच संबंधित मातेला तातडीने सर्वोपचार रुग्णालयात संदर्भीत करण्यात येते. गर्भवतींना कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेता जिल्हा स्त्री रुग्णालयात आधीच विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. शिवाय, प्रतिबंधित क्षेत्रातून येणाºया गर्भवतींसाठी स्वतंत्र वॉर्डाची निर्मिती केल्याने इतरांना त्याचा धोका नाही.
- डॉ. आरती कुलवाल, वैद्यकीय अधीक्षिका, जिल्हा स्त्री रुग्णालय, अकोला