८४ खेडी, खांबोरा पाणीपुरवठा योजनेचा वीज पुरवठा खंडीत करणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:19 AM2021-03-10T04:19:31+5:302021-03-10T04:19:31+5:30
जिल्हा परिषद अंतर्गत ८४ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना आणि खांबोरा येथील ६४ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना या दोन प्रादेशिक ...
जिल्हा परिषद अंतर्गत ८४ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना आणि खांबोरा येथील ६४ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना या दोन प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांच्या वीज देयकांची फेब्रुवारी अखेरपर्यंत २ कोटी १७ लाख रुपयांची रक्कम थकीत आहे. त्यानुषंगाने यासंदर्भात महावितरणच्या अधिकाऱ्यांनी ९ मार्च रोजी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांची भेट घेऊन चर्चा केली. वीज देयकाच्या थकीत रकमेचा भरणा न केल्यास ८४ खेडी व खांबोरा ६४ गावे या दोन्ही प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांचा वीज पुरवठा खंडीत करण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचा इशारा महावितरणच्या अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना यावेळी दिला. पाणीपट्टीची रक्कम संबंधित पंचायत समित्यांकडून वसूल करुन येत्या आठ दिवसात थकीत वीज देयकांची रक्कम अदा करण्यात येणार आहे, असे आश्वासन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांनी महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी दिले. परंतू वीज देयकाच्या थकीत रक्कमेचा भरणा न केल्यास ८४ खेडी व ६४ खेडी या दोन्हा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांचा वीज पुरवठा खंडीत करण्याचा इशारा महावितरणने दिला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेने थकबाकीचा भरणा न केल्यास आणि महावितरणकडून वीज पुरवठा खंडीत करण्याची कार्यवाही केल्यास दोन्ही प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांतर्गत गावांमध्ये जलसंकटाची परिस्थितीची निर्माण होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यातील ८४ खेडी आणि ६४ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या वीज देयकांची थकीत रक्कमेचा भरणा न केल्यास महावितरणकडून आठवडाभरात दोन्ही योजनांचा वीजपुरवठा खंडीत करण्यात येणार आहे. त्यामुळे दोन्ही प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांतर्गत ग्रामपंचायतींनी पाणीपट्टीची रक्कम तातडीने वसूल करणे गरजेचे आहे.
सौरभ कटियार
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद.
.............................फोटो......................