८४ वर्षांची आजी कसते शेती; वर्षाकाठी मिळविते लाखोंचे उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2022 12:36 PM2022-04-05T12:36:39+5:302022-04-05T12:37:43+5:30

84-year-old grandmother farming : या आजी शेतीचे संपूर्ण वार्षिक नियोजन स्वतः करून त्यातून लाखोंचे उत्पन्न घेतात.

84-year-old grandmother farming; Earns millions a year | ८४ वर्षांची आजी कसते शेती; वर्षाकाठी मिळविते लाखोंचे उत्पन्न

८४ वर्षांची आजी कसते शेती; वर्षाकाठी मिळविते लाखोंचे उत्पन्न

googlenewsNext
ठळक मुद्देतरुणाला लाजविणारी धडपड शासनाने गौरविले, २५ एकराच्या शेतीची केली वृद्धी

- संजय उमक

मूर्तिजापूर : तालुक्यातील गोरेगाव येथील ८४ वर्षांची ‘तरुण’ आजी अजूनही शेतात राबून शेती करीत असल्याची आश्चर्यकारक बाब समोर आली आहे. या आजीला शासनाने प्रोत्साहन पारितोषिक देऊन गौरविले आहे. या आजी शेतीचे संपूर्ण वार्षिक नियोजन स्वतः करून त्यातून लाखोंचे उत्पन्न घेतात.

तालुक्यातील गोरेगाव येथील गावालगत असलेल्या शेतात बांधलेल्या घरात मुला व नातवासह मनकर्णाबाई रामराव डोईफोडे (८४) या शेतकरी आजी राहतात. मनकर्णाबाई यांचे पती रामराव यांचे १९७२ ला आजारामुळे निधन झाले. त्यानंतर त्यांच्याकडे पाच एकर शेती हिश्श्याला आली. मुले लहान होती, पण अशा बिकट परिस्थितीत त्यांनी लहान मुलांना सोबत घेऊन कष्ट करून ५ एकराची आता ३० एकर शेती केली. आजमितीस त्यांच्याकडे ३० एकर शेती असून, ती स्वतः या शेतीत राबते. शेतीमध्ये आजी सुरुवातीला केळी, पपई, असे फळपिके घ्यायची. सद्यस्थितीत खरीप हंगामाला कपाशी, सोयाबीन, तूर, रब्बी हंगामाला हरभरा, गहू, उन्हाळी भुईमूग, भाजीपाला पिकविते. आश्चर्य म्हणजे ज्या जमिनीमध्ये केळी उत्पादन घेऊ शकत नाही, अशा जमिनीत आजीने केळीचे विक्रमी उत्पादन घेतले. यासाठी २००२ मध्ये महाराष्ट्र शासन कृषी विभागाने आजीला नऊ हजार रुपयांचे प्रोत्साहन पारितोषिक देऊन सन्मानित केले. ८४ वर्षांच्या आजीची प्रकृती ठणठणीत आहे. त्यांची नजर व श्रवणभक्ती तीक्ष्ण आहे. अजूनही त्यांच्या डोळ्याला चष्मा नाही किंवा कुठल्याही आजाराने ग्रस्त नाहीत.

 

मेहनतीने कमाविले तर...

शेतात सर्वांना लाजवेल असे काम त्या मजुरांबरोबर करतात. मेहनत केल्याशिवाय पर्याय नाही, मेहनतीने जर कमाविले तर त्याला डागसुद्धा लागत नाही, अशाही त्या स्वाभिमानाने आजही सांगतात. आजीचे जीवन म्हणजे पूर्ण संघर्षमय, आयुष्यात भरपूर संकटे आली आजीने त्यावर मात केली. एवढेच नव्हे तर शेती करणारी आजी तरुण शेतकऱ्यांसाठी आदर्शवत आहे.

पतीच्या निधनानंतर शेतीची संपूर्ण जबाबदारी माझ्यावर आली. त्यानंतर शेतीत स्वतःला झोकून दिले. तेव्हा ५ एकर शेती होती, आता ३० एकर आहे. मजुरांकडून काम करून घेत असताना स्वतःही त्यांच्याबरोबर काम करते, एकरी १५ क्विंटल उत्पन्न आजही घेते.

- मनकर्णाबाई डोईफोडे, शेतकरी, गोरेगाव

 

 

Web Title: 84-year-old grandmother farming; Earns millions a year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.