अकोला-रतलाम गेज परिवर्तनसाठी ८८८ कोटी; मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा अडसर कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2022 02:00 PM2022-02-06T14:00:34+5:302022-02-06T14:04:54+5:30
Akola-Ratlam gauge conversion : अकोट ते खंडवापर्यंतचे गेजपरिवर्तनाचे भवितव्य मात्र अधांतरीच लटकण्याची शक्यता आहे.
अकोला : दक्षिण व उत्तर भारताला जोडणारा सर्वात सरळ व कमी अंतराच्या रतलाम-खंडवा-अकोला या लोहमार्गाचे गेजपरिवर्तन करण्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात आणखी ८८८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याने, गत अनेक वर्षांपासून रखडलेले काम मार्गी लागण्याची आशा पल्लवीत झाली आहे. तथापि, मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून काम करण्यास हिरवी झेंडी मिळाली नसल्याने अकोट ते खंडवापर्यंतचे गेजपरिवर्तनाचे भवितव्य मात्र अधांतरीच लटकण्याची शक्यता आहे. रतलाम-महू-खंडवा-अकोला या ४७३ किलोमीटर लांबीचा मीटरगेज मार्ग ब्राॅडगेजमध्ये रूपांतरित करण्यासाठी २००८ मध्ये मंजुरी मिळाली होती. १४७२ कोटी रुपयांचा हा प्रकल्प २०१५ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. आता या प्रकल्पाची किंमत ४००० कोटीवर पोहोचली आहे. गत सहा अर्थसंकल्पांमध्ये यासाठी १९९६ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. त्यानंतरही महाराष्ट्रातील अकोट ते खंडवा व मध्य प्रदेशातील बलवाडा ते महू दरम्यान वनविभागाची मंजुरी व जमीन अधिग्रहणामुळे हा प्रकल्प रखडलेला आहे.
१३१ किलोमीटरचे काम अधांतरी
तब्बल ४७३ किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पांतर्गत महाराष्ट्रात अकोला ते अकोटपर्यंत ४३ किमी लांबीचे काम पूर्ण झाले आहे. मध्य प्रदेशात रतलाम ते महूपर्यंतचे काम पूर्ण झाले आहे. आता अकोट ते अमला खुर्द आणि सनावद ते महू असे एकूण १३१ किलोमीटरचे काम रखडलेले आहे.
मेळघाट की पर्यायी मार्ग?
अकोट ते खंडवा लोहमार्गाचा ३८ किलोमीटरचा पट्टा मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून जातो. यापैकी २३ किमी लांबीचा मार्ग हा गाभा क्षेत्रातून जातो. त्यामुळे मेळघाटातून ब्राॅडगेजच्या कामाला पर्यावरणप्रेमींनी आक्षेप घेतला आहे. तसेच राज्य सरकारनेही या मार्गाला हिरवी झेंडी दिलेली नाही. मेळघाटऐवजी हिवरखेड-सोनाळा-जामोद-कुंवरदेव मार्गे खंडवापर्यंत नेण्याचा प्रस्ताव आहे. आता या प्रकल्पासाठी निधी मिळाल्यामुळे हा मार्ग नेमका कोठून जातो, याकडे लक्ष लागले आहे.