अकोला जिल्ह्यात ८९ टक्के पोलिओ लसीकरण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2020 12:13 PM2020-01-20T12:13:31+5:302020-01-20T12:13:41+5:30
मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील १लाख ८२ हजार ७५७ बालकांना लसीकरणाचे उद्दिष्ट होते; पहिल्याच दिवशी ८९ टक्के उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.
अकोला : राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेंतर्गत रविवारी शहरी व ग्रामीण भागात ८९ टक्के लसीकरण झाले. जिल्हा स्त्री रुग्णालय येथे केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या हस्ते बाळाला लसीकरण करून मोहिमेची सुरुवात करण्यात आली.
राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेची सुरुवात जिल्हा स्त्री रुग्णालयातून करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, वैद्यकीय अधीक्षिका डॉ. आरती कुलवाल, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. मधुकर राठोड, महेंद्र मोहिते, डॉ. सीमा तायडे व डॉ. इंद्रायणी मिश्रा यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील १लाख ८२ हजार ७५७ बालकांना लसीकरणाचे उद्दिष्ट होते. मोहिमेच्या पहिल्याच दिवशी यातील ८९ टक्के उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. मोहिमेसाठी जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात १ हजार ३९२ बुथची स्थापना करण्यात आली होती. सलग पाच दिवस घरोघरी जाऊन ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना लसीकरण केले जाणार आहे. मोहिमेच्या यशस्वीतेसाठी डॉ. मानकर, प्रकाश गवळी, डॉ. काळे, नरेंद्र बेलुकर, संदीप वानखडे, विजय घुगे, एन. एस. किरडे, प्रशांत गुल्हाने, दीपक मलखेडे व संदीप देशमुख यांनी परिश्रम घेतले.
पंचगव्हाण येथे लसीकरण मोहिमेचे उद््घाटन
ग्रामीण भागात पंचगव्हाण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभा भोजने यांच्या हस्ते पोलिओ लसीकरण मोहिमेचे उद््घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सावित्रीताई राठोड, पंचायत समिती सदस्य आम्रपाली गवारगुरू, सरपंच भास्कर गवारगुरू, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एस. वाय. असोले, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय जाधव, डॉ. विवेक पेंढारकर, डॉ. चव्हाण व सैफुल्ला खान यांची उपस्थिती होती.
मनपा क्षेत्रात ५२ हजार बालकांना लसीकरण
महापालिका क्षेत्रांतर्गत २५० बुथवर ५२ हजार ८५२ बालकांना पोलिओ लसीकरण करण्यात आले. मोहिमेंतर्गत ९७८ आरोग्य कर्मचारी व ५२ पर्यवेक्षक ांची नियुक्त केली होती. कस्तुरबा गांधी महिला रुग्णालयात आयोजित उपक्रम वैद्यकीय अधिकारी डॉ. फारुख शेख व डॉ. अजमल खान यांच्या मार्गदर्शनात पार पडला.