अकोला जिल्ह्यात डीएलएडच्या ९00 जागा; प्रवेश केवळ १३८
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2018 02:50 PM2018-07-04T14:50:49+5:302018-07-04T14:53:40+5:30
जिल्ह्यात डीएलएड अभ्यासक्रमाच्या ९00 जागा आहेत आणि प्रवेश केवळ १३८ विद्यार्थ्यांनीच घेतले आहेत. यावरून डीएलएडच्या अभ्यासक्रमाबाबत विद्यार्थ्यांमध्ये किती उदासीनता आहे, हे दिसून येते.
- नितीन गव्हाळे
अकोला: दहा वर्षांपूर्वी डीएड कॉलेजमध्ये प्रवेश मिळत नव्हता, एवढी स्पर्धा होती; परंतु सद्यस्थितीत मात्र डीएलएडच्या विद्यालयांची विदारक परिस्थिती झाली आहे. विद्यार्थी संख्येअभावी डीएलएड विद्यालये बंद आहेत. जिल्ह्यात डीएलएड अभ्यासक्रमाच्या ९00 जागा आहेत आणि प्रवेश केवळ १३८ विद्यार्थ्यांनीच घेतले आहेत. यावरून डीएलएडच्या अभ्यासक्रमाबाबत विद्यार्थ्यांमध्ये किती उदासीनता आहे, हे दिसून येते. एवढेच नाही तर विद्यार्थी संख्येअभावी जिल्ह्यातील सात खासगी अध्यापक विद्यालयांनी बंदचे प्रस्ताव पाठविले आहेत.
एकेकाळी शासकीयसोबतच खासगी अध्यापक विद्यालयांचा सुवर्णकाळ होता. बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांचा सर्वाधिक कल डीएड करण्याकडे होता. शिक्षकांची नोकरी मिळवायची, हे प्रत्येकाचे स्वप्न होते. त्यावेळी विज्ञान, वाणिज्य शाखेला महत्त्व न देता, हजारो विद्यार्थी डीएडला महत्त्व द्यायचे. पालकही मुलांना डीएड करण्याचा आग्रह धरायचे. त्यामुळे राज्यातच नव्हे तर जिल्ह्यातसुद्धा खासगी अध्यापक विद्यालये सुरू करण्यात आली. मोठ्या प्रमाणात डोनेशन भरून विद्यार्थी डीएड पदविका प्राप्त करू लागले; परंतु कालांतराने शिक्षक भरती बंद झाली. जिल्हा परिषद, नगर परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थी कॉन्व्हेंटकडे वळू लागले. त्यामुळे या शाळा ओस पडू लागल्या. विद्यार्थी संख्येअभावी शाळांमधील शिक्षक अतिरिक्त ठरू लागले. त्यामुळे आता शिक्षकाची नोकरी नको रे बाबा...असा सूर ऐकायला येऊ लागला. बंद झालेली शिक्षक भरती, शिक्षकांच्या मागे लागलेली अशैक्षणिक कामे, यामुळे विद्यार्थ्यांनी डीएलएड विद्यालयांकडे पाठ फिरविली. ज्या डीएलएड अभ्यासक्रमासाठी स्पर्धा लागायची, त्या डीएलएड अभ्यासक्रमापासून विद्यार्थी दूर पळू लागले. एकंदरीत शासकीय आणि खासगी अध्यापक विद्यालयांना अवकळा प्राप्त झाली आहे. ही विद्यालये ओस पडली आहेत. अनुदानित अध्यापक विद्यालयांना टाळे लागण्याची वेळ आली आहे. शिक्षक भरती सुरू झाली तरच पुन्हा अध्यापक विद्यालयांना चांगले दिवस येतील, असे मत शिक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केले.
दोनदा मुदतवाढ
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे ४ जूनपासून डीएलएडच्या प्रथम वर्षासाठी आॅनलाइन शासकीय कोट्यातून अर्ज मागविले आहेत. प्रवेशासाठी २0 जून अंतिम मुदत होती, ती ३0 जूनपर्यंत वाढविण्यात आली. यानंतरही विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळत नसल्याने ही मुदत ७ जुलैपर्यंत वाढविण्यात आली.
डीएलएडच्या जागा भरपूर आहेत; परंतु विद्यार्थी संख्येअभावी शेकडो जागा रिक्त आहेत. केवळ आतापर्यंत १३८ विद्यार्थ्यांनी डीएलएडला प्रवेश घेतला आहे. ७ जुलैपर्यंत प्रवेश अर्ज करण्यासाठी संधी विद्यार्थ्यांना आहे.
डॉ. प्रकाश जाधव, प्राचार्य, जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था