सिंचन कामांचा ९४ कोटींचा आराखडा रखडला!
By admin | Published: December 1, 2014 12:33 AM2014-12-01T00:33:50+5:302014-12-01T00:35:14+5:30
मंजुरीची प्रतीक्षा : कोल्हापुरी-सिमेंट नाला बंधा-यांची २00 कामे प्रस्तावित.
संतोष येलकर /अकोला
जिल्ह्यातील सिंचन क्षेत्रात वाढ व्हावी, यासाठी विदर्भ सघन सिंचन विकास कार्यक्रमांतर्गत जिल्हय़ात कोल्हापुरी बंधारे, सिमेंट बंधार्यांसह नाला सरळीकरणाच्या ९४ कोटी ६७ लाख ८५ हजारांच्या नवीन सिंचन कामांचा आराखडा जिल्हा परिषद लघुसिंचन विभागामार्फत तयार करण्यात आला आहे. कृती आराखड्यात प्रस्तावित २00 कामांचा हा आराखडा लघुपाटबंधारे स्थानिक स्तर विभागाच्या नागपूर येथील मुख्य अभियंत्यांकडे मान्यतेसाठी सादर करण्यात आला असून, या आराखड्याला मंजुरी मिळण्याची चार महिन्यांपासून प्रतीक्षा सुरु आहे.
विदर्भातील सिंचनाचे क्षेत्र वाढविण्यासाठी शासनामार्फत विदर्भ सघन सिंचन विकास कार्यक्रम गेल्या तीन वर्षांपासून राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमात अकोला जिल्ह्यातील सिंचनाच्या क्षेत्रात वाढ व्हावी, यासाठी जिल्ह्यातील सातही तालुक्यांत विविध गावांमध्ये २५0 हेक्टर सिंचन क्षमतेची नवीन कोल्हापुरी बंधारे, सिमेंट नाला बंधारे व त्यासाठी नाला सरळीकरणाच्या कामांचा कृती आराखडा जिल्हा परिषद लघुसिंचन विभागामार्फत तयार करण्यात आला. जिल्ह्यातील मूर्तिजापूर, अकोला, बाश्रीटाकळी, आकोट, तेल्हारा, पातूर व बाळापूर या सातही तालुक्यात सिंचनाची नवीन २00 कामे या आराखड्यात प्रस्तावित करण्यात आली आहेत. या कामांसाठी ९४ कोटी ६७ लाख ८५ हजार रुपयांचा खर्च प्रस्तावित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील नवीन सिंचनाच्या कामांचा हा आराखडा जिल्हा परिषद लघुसिंचन विभागामार्फत चार महिन्यांपूर्वी शासनाच्या लघुपाटबंधारे (स्थानिक स्तर) विभागाच्या नागपूर येथील मुख्य कार्यकारी अभियंत्यांकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे.
या आराखड्याला मंजुरी मिळाल्यास जिल्ह्यात नवीन कोल्हापुरी बंधारे, सिमेंट बंधारे व त्यासाठी नाला खोलीकरणाची कामे सुरू होतील. नवीन सिंचन कामांच्या या आराखड्यास मंजुरी मिळाल्यास जिल्ह्यातील सिंचन क्षेत्र वाढविण्यास गती मिळणार आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील २00 सिंचन कामांचा समावेश असलेल्या या कृती आराखड्यास मुख्य अभियंत्यांकडून केव्हा मंजुरी मिळणार, याबाबतची प्रतीक्षा केली जात आहे.