गावंडगाव येथे तापामुळे ९ वर्षीय मुलीचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:46 AM2021-01-13T04:46:27+5:302021-01-13T04:46:27+5:30
नासीर शेख खेट्री : पातुर तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या गावंडगाव येथे गत काही दिवसांपासून तापाची लाट सुरू असून, तापामुळे ...
नासीर शेख
खेट्री : पातुर तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या गावंडगाव येथे गत काही दिवसांपासून तापाची लाट सुरू असून, तापामुळे ९ वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे. जया विनोद राठोड असे मृत मुलीचे नाव आहे.
मृत जया राठोड या मुलीला शनिवारी ताप, डोकेदुखी आजाराची लक्षणे आढळून आल्याने तिच्या नातेवाइकांनी तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार केले. परंतु रविवारी पहाटे तिचा मृत्यू झाला. तसेच गावातील जवळपास १० ते १५ रुग्ण उपचार घेत आहेत. गावात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले असून, गावाला पाणीपुरवठा होणाऱ्या पिण्याच्या पाण्यात ब्लिचिंग पावडर टाकली जात नाही. तसेच टाकीची साफसफाई केली जात नाही, असा आरोप संतप्त ग्रामस्थांकडून होत आहे. याकडे संबंधित आरोग्य विभाग व स्थानिक प्रशासन यांचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे. याकडे संबंधित वरिष्ठांनी दखल घेऊन आरोग्य तपासणी, गावात स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी होत आहे.
--------बाॅक्स------
स्वच्छता मोहीम कागदोपत्री
गावात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. घरातील सांडपाणी रस्त्यावर साचल्याने दुर्गंधी पसरली आहे. स्वच्छता मोहीम कागदोपत्री राबविली जात आहे. घाणीच्या साम्राज्यामुळे ग्रामस्थांना विविध आजार होत आहेत.
--------काेट--------------
घरातील सांडपाणी रस्त्यावर साचल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला असून, सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. याबाबत ग्रामपंचायतकडे वारंवार तक्रार केली, परंतु अद्यापही दखल घेतली गेली नाही. त्यामुळे विविध आजाराला ग्रामस्थांना तोंड द्यावे लागत आहे.
- विजय राठोड, गावंडगाव
--------काेट---------
गावात आरोग्य फवारणीची मागणी केली आहे. तसेच ब्लिचिंग पावडर टाकून गावात स्वच्छता मोहीम राबविण्यात येईल.
- चरणसिंग चव्हाण, सरपंच, गावंडगाव
--------काेट---------
गावातून एक मोठा नाला गेलेला आहे. गावात स्वच्छता वेळोवेळी करून पिण्याच्या पाण्यामध्ये ब्लिचिंग पावडर टाकली जाते.
- आर. डी. आरकराव, सचिव, गावंडगाव