९० रेमडेसिविर इंजेक्शन आंध्रातील अकाेल्याऐवजी पाेहाेचले महाराष्ट्रातील अकाेल्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 10:51 AM2021-04-27T10:51:31+5:302021-04-27T10:52:07+5:30
Remedacivir injections : प्रकरण गंभीर असल्याने या प्रकरणाची तक्रार अन्न व औषध प्रशासन विभागाने रामदासपेठ पाेलीस ठाण्यात दिली़.
अकाेला : अकाेल्यात पाेहाेचलेल्या ९० रेमडेसिविर इंजेक्शन प्रकरणाची चाैकशी अन्न व औषध प्रशासन विभागाने सुरू केली असता हे इंजेक्शन आंध्र प्रदेशातील अकाेला या गावातील बालाजी मेडिकलऐवजी महाराष्ट्रातील अकाेल्यात असलेल्या बालाजी मेडिकलवर आल्याचे साेमवारी उघड झाले़; मात्र तशा प्रकारचे दस्तावेज प्राप्त न झाल्याने या प्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाने रामदासपेठ पाेलीस ठाण्यात तक्रार दिली़. यावरून पाेलिसांनी अज्ञात आराेपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़. तसेच हे ९० इंजेक्शन गरजूंना देण्यात यावे यासाठी न्यायालयात खटला दाखल केल्याची माहिती आहे़\
अकाेल्यातील आदर्श कॉलनी आणि दुर्गा चाैकात दाेन्ही ठिकाणी बालाजी मेडिकल नावाने दुकान आहे़ शनिवारी दुपारी ९० रेमडेसिविर इंजेक्शनचे पार्सल आदर्श काॅलनीतील बालाजी मेडिकलवर पोहोचले. मात्र त्यांनी ऑर्डरच दिलेली नसल्याने त्यांनी अन्न व औषध प्रशासनाला माहिती दिली. एफडीएच्या अधिकाऱ्यांनी देयकावरून तपासणी केली असता हे पार्सल दुर्गा चौकातील डॉक्टर बोचरे यांच्या बालाजी मेडिकलचे असल्याचे समोर आले. यावरून बोचरे यांची चाैकशी केली असता त्यांनीही हे इंजेक्शन बाेलावले नसल्याचे समाेर आले़ रेमडेसिविर इंजेक्शनचा माेठ्या प्रमाणात काळाबाजार सुरू असल्याने ते टाळाटाळ करीत असल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या निदर्शनास आले़. त्यामुळे दाेघांचेही बँक डिटेल्स मागितले असता त्यांनी ही रक्कमच संबधित कंपनीला पाठविली नसल्याचे समाेर आले़. त्यामुळे दाेन्ही मेडिकलचे संचालक आणि अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी हैदराबाद येथील कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी हे पार्सल केवळ नामसाधर्म्यामुळे महाराष्ट्रातील अकाेला येथील बालाजी मेडिकलवर आल्याची माहिती दिली़. हे ९० रेमडेसिविर इंजेक्शनचे पार्सल आंध्र प्रदेशात असलेल्या अकाेला गावातील बालाजी मेडिकलवर पाठवायचे असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले़. मात्र प्रकरण गंभीर असल्याने या प्रकरणाची तक्रार अन्न व औषध प्रशासन विभागाने रामदासपेठ पाेलीस ठाण्यात दिली़. यावरून पाेलिसांनी अन्न व औषध प्रशासन आणि साैंदर्य प्रसाधन कायदा तसेच अत्यावशयक वस्तू व सेवा कायद्यानुसार अज्ञात आराेपीविरुध्द गुन्हा दाखल केला आहे़. या प्रकरणाचा तपास आता रामदासपेठ पोलिसांनी सुरू केला असून हे पार्सल ज्या कुरिअर कंपनीने आले त्या कुरिअर कंपनीसह हैदराबाद येथील कंपनीची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती रामदासपेठ पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन गुल्हाने यांनी दिली. कंपनीचे अधिकारीही अकाेल्यात येणार असून हे केवळ चुकीने झाल्याचे सर्व दस्तावेज व ज्या मेडिकलच्या संचालकांनी खात्यात रक्कम पाठविली त्यांची पुराव्यासह माहिती देणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे़