तीन वर्षांत जिल्ह्यात ‘एचआयव्ही’चे ९४० ‘पॉझिटिव्ह’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2019 12:12 PM2019-12-01T12:12:11+5:302019-12-01T12:12:34+5:30
गत तीन वर्षांत जिल्ह्यात एचआयव्हीचे १ हजार ९४० रुग्ण समोर आले असून, यामध्ये ५१ गर्भवतींचा समावेश आहे.
अकोला : एड्सवर प्रतिबंध घालण्यासाठी एड्स नियंत्रण कक्षातर्फे जिल्हा व ग्रामीण स्तरावर तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. यातूनच गत तीन वर्षांत जिल्ह्यात एचआयव्हीचे १ हजार ९४० रुग्ण समोर आले असून, यामध्ये ५१ गर्भवतींचा समावेश आहे.
एचआयव्हीवर तत्काळ निदान व औषधोपचार हे उद्दिष्ट लक्षात घेऊन जिल्ह्यातील आयसीटीसी व एआरटी केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. यांतर्गत जिल्हा व ग्रामीण स्तरावर एकूण ५८ एचआयव्ही तपासणी केंद्र व दोन मुख्य औषधोपचार, तर सहा सहायक औषधोपचार केंद्रे कार्यरत आहेत. यांतर्गत दरवर्षी जवळपास एक लाख व्यक्तींची तपासणी केली जाते. जिल्ह्यातील सामान्य व्यक्ती, गरोदर माता, अतिजोखमीचा गट, अशा प्रत्येक घटकापर्यंत थेट पोहोचता यावे व त्यांची तपासणी व्हावी, यासाठी काही अशासकीय संस्थांचा समावेश एचआयव्ही कार्यक्रमात करण्यात आलेला आहे. या सर्वच संस्थांच्या माध्यमातून वर्षभर विविध स्तरावर एचआयव्हीबाबत जनजागृती व स्क्रीनिंग टेस्ट मोहीम राबविण्यात येत असल्याने एचआयव्ही पॉझिटिव्हचे प्रमाण काही प्रमाणात कमी झाले आहे. असे असले तरी एचआयव्हीचा धोका टाळण्यासाठी सावधता बाळगणे आवश्यक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
गरोदर मातांना सेवा पुरविण्यात जिल्हा अव्वल
महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था मुंबईच्या माहितीनुसार, अकोला जिल्हा हा गरोदर मातांना देण्यात येणाऱ्या सुविधा कार्यक्रमात राज्यात प्रथम असल्याचे घोषित करण्यात आले आहे.
एड्स जनजागृती रॅली आज
एचआयव्हीवर प्रतिबंधासाठी प्रत्येकाने एचआयव्ही चाचणी करावी, यानुषंगाने जागतिक एड्स दिनानिमित्त रविवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून जनजागृती रॅली काढण्यात येणार आहे. यांतर्गत ‘आपण बदल घडवू शकतो’ हे घोषवाक्य देत जनजागृती केली जाईल. या उपक्रमात युवा वर्गाला केंद्रस्थानी ठेवण्यात आल्याने शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा रॅलीत मोठ्या संख्येने सहभाग असणार आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण यांनी दिली.