पोलीस निवासस्थानांच्या दुरुस्तीसाठी ९.५ कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 01:53 PM2019-05-27T13:53:48+5:302019-05-27T13:54:09+5:30
पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची झालेली दुरवस्था दूर करण्यासाठी राज्य शासनाने तब्बल साडेनऊ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : अकोला शहरातील पोलिसांच्या निवासस्थानांसह तालुका व ग्रामीण भागातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची झालेली दुरवस्था दूर करण्यासाठी राज्य शासनाने तब्बल साडेनऊ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे तब्बल २४७ पोलीस निवासस्थान लवकरच चकाचक होणार आहेत.
राज्य शासनाने निवासस्थान दुरुस्तीसाठी ९ कोटी २० लाख ३७ हजार ६९९ रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून अकोला शहरातील १९ पोलीस अधिकाºयांच्या निवासस्थानांची दुरुस्ती होणार आहे. त्यानंतर शहरातीलच १३७ पोलीस कर्मचारी सेवा निवासस्थानांची दुरुस्ती होणार आहे. त्यानंतर पातूर येथील शिपाई दल सेवा निवासस्थानाची दुरुस्ती, मूर्तिजापूर येथील दोन पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाºयांसाठीचे निवासस्थान दुरुस्ती, दोन सहायक पोलीस निरीक्षक आणि पाच पोलीस हवालदार, सहा पोलीस शिपाई आणि आणखी आठ पोलीस शिपायांच्या निवासस्थानांची या निधीतून दुरुस्ती होणार आहे.
बार्शीटाकळी येथील सहा अविवाहित पोलीस शिपायांच्या निवासस्थानांची दुरुस्ती होणार आहे. यासोबतच पिंजर येथील १२ पोलीस कर्मचारी, तेल्हारा येथील आठ पोलीस कर्मचारी, हिवरखेड येथील १३ पोलीस कर्मचारी आणि अकोट येथील २८ पोलीस कर्मचाºयांच्या निवासस्थानांची दुरुस्ती करण्यात येणार आहे.
या दुरुस्तीमध्ये ही निवासस्थाने चकाचक करण्यात येणार असून, निधी प्राप्त होताच या निवासस्थान दुरुस्तीचे बांधकाम युद्धपातळीवर सुरू होणार आहे. या निवासस्थान दुरुस्तीसाठी १० कोटी ४१ लाख २६ हजार ८४४ रुपयांचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यापैकी ९ कोटी २० लाख ३७ हजार ६९९ रुपयांच्या निधीस मंजुरी देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाºयांच्या निवासस्थानासाठी चांगली सुविधा असावी म्हणून त्यांचे निवासस्थान दुरुस्तीसाठी प्रस्ताव तयार करून वारंवार पाठपुरावा करण्यात आला. शासनाने २४७ निवासस्थानांची दुरुस्तीसाठी मंजुरी दिल्याने अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना सुविधा मिळणार आहेत. यासोबतच सुमारे ४०० निवासस्थान नव्याने बांधण्यात येत असून, पोलिसांना या ठिकाणी चांगली घरे मिळणार आहेत.
- एम. राकेश कलासागर,
पोलीस अधीक्षक, अकोला.