नऊ राज्यांतील ९७३ मजूर अकोला तालुक्यात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2020 11:09 AM2020-03-31T11:09:28+5:302020-03-31T11:09:39+5:30
मजुरांची आरोग्य तपासणी करण्याचे निर्देश प्राथमिक आरोग्य केंद्रांना (पीएचसी) देण्यात आले आहेत.
अकोला : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी शासनामार्फत विविध उपाययोजना करण्यात येत असून, मजुरांचे स्थलांतर थांबविण्यात आले आहे.
त्यानुषंगाने राज्याबाहेरून जिल्ह्यात आलेल्या मजुरांची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मागविण्यात आली आहे. त्यानुसार विविध नऊ राज्यांतील ९७३ मजूर अकोला तालुक्यात आले असून, संबंधित मजुरांची आरोग्य तपासणी करण्याचे निर्देश प्राथमिक आरोग्य केंद्रांना (पीएचसी) देण्यात आले आहेत, अशी माहिती अकोल्याचे तहसीलदार विजय लोखंडे यांनी सोमवारी दिली.
कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग टाळण्यासाठी देशभरात ‘लॉकडाउन’ जाहीर करण्यात आले असून, राज्यभरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात कामानिमित्त आलेल्या परराज्यातील मजुरांचे स्थलांतर थांबविण्यात आले आहे. त्यानुषंगाने परराज्यातून जिल्ह्यात विविध कामासाठी आलेल्या मजुरांची माहिती सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्ह्यातील तहसीलदारांना देण्यात आले आहेत. त्यानुसार मंडळ अधिकारी व तलाठ्यांकडून सादर करण्यात आलेल्या माहितीनुसार अकोला तालुक्यातील विविध गावांमध्ये वेगवेगळ्या कामासाठी नऊ राज्यांतील ९७३ मजूर आले
आहेत, अशी माहिती अकोला तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सोमवारी सादर करण्यात आली. अकोला तालुक्यात कामासाठी आलेल्या नऊ राज्यांतील
संबंधित मजुरांची आरोग्य तपासणी करण्याचे निर्देश तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना देण्यात आल्याचे अकोल्याचे तहसीलदार विजय लोखंडे यांनी सांगितले.
‘या’ नऊ राज्यांतील मजुरांचा आहे समावेश!
अकोला तालुक्यातील गावांमध्ये विविध कामांसाठी नऊ राज्यांतील ९७३ मजूर आले आहेत. त्यामध्ये आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात, झारखंड, तामिळनाडू, तेलंगणा, बिहार, मध्यप्रदेश व राजस्थान इत्यादी नऊ राज्यांतील मजुरांचा समावेश आहे, अशी माहिती अकोल्याचे तहसीलदार विजय लोखंडे यांनी दिली.