चक्क जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे बनावट व्हाट्सअॅप अकाऊंट!
By रवी दामोदर | Published: May 3, 2024 07:10 PM2024-05-03T19:10:19+5:302024-05-03T19:10:30+5:30
सायबर सेलला कारवाईचे निर्देश.
अकोला : अकोल्याचे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांचे छायाचित्र वापरून व्हाट्स ॲपवरील बनावट अकाऊंटद्वारे परिचित व नागरिकांकडे पैश्याची मागणी होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. अशा मेसेजवर कुणीही विश्वास ठेवू नये व अशा अकाऊंटहून संदेश येताच तत्काळ 'रिपोर्ट' करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी केले आहे.
प्राप्त माहितीनुसार, आधार केंद्रचालक योगेश भाटी यांना जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या नावे असा मेसेज प्राप्त झाला. तो बनावट असल्याचे लक्षात येताच त्यांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना अवगत केले. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ दखल घेऊन सायबर सेलला कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. अशा प्रकारचे कुठलेही संदेश प्राप्त झाल्यास कुणीही बळी पडू नये. अशा गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी तत्काळ चौकशी, तसेच कारवाई व नागरिकांना सतर्कतेबाबत भरीव जनजागृती करावी, असे आदेश सायबर सेलला देण्यात आले आहेत.