गावरान मेवा, दुर्मिळ भाज्यांचा महोत्सव; शेतकऱ्यांकडून रानभाज्यांची विक्री, अकोलेकराची झुंबड
By रवी दामोदर | Published: August 13, 2023 01:40 PM2023-08-13T13:40:14+5:302023-08-13T13:41:08+5:30
मूर्तिजापूर रस्त्यावरील ‘आत्मा’ कार्यालयाच्या परिसरात रानभाजी महोत्सव उत्साहात संपन्न झाला.
अकोला : कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेतर्फे (आत्मा) शनिवार, दि.१२ ऑगस्ट रोजी आयोजित जिल्हा रानभाजी महोत्सवात गावरान मेवा, दुर्मिळ भाज्यांचा समावेश असल्याने ते खरेदीसाठी अकोलेकरांची झुंबड उडाल्याचे दिसून आले. मूर्तिजापूर रस्त्यावरील ‘आत्मा’ कार्यालयाच्या परिसरात रानभाजी महोत्सव उत्साहात संपन्न झाला.
महोत्सवात वैयक्तिक शेतकरी, शेतकरी उत्पादन कंपनी, शेतकरी गटांमार्फत गावरान मेवा, दुर्मिळ रानभाज्या विक्रीला आणल्या होत्या. यंदा रानभाजी महोत्सवात वेगवेगळ्या रानभाज्यांचे तब्बल ५० स्टॉल होते. महोत्सवाचे उद्घाटन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी केले, तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार अमोल मिटकरी यांची उपस्थिती होती. महोत्सवादरम्यान जिल्हाधिकाऱ्यांसह पाहुण्यांनी रानभाज्यांच्या स्टाॅलला भेटी देऊन रानभाज्यांविषयी माहिती घेत रानभाज्यांची खरेदी केली. यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या समस्या मांडल्या असता जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचे निरसन केले.
महोत्सवात आमदार अमोल मिटकरी यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे, ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक डॉ. मुरली इंगळे, डीएफओ कुमार स्वामी, ‘आत्मा’चे प्रकल्प उपसंचालक मिलिंद जंजाळ आदींसह कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका कृषी अधिकारी शशिकिरण जांभरुणकर यांनी केले, तर आभार प्रकल्प संचालक डॉ. मुरली इंगळे यांनी मानले.
५० हजारांची उलाढाल
नागरिकांना रानभाज्यांची ओळख, आरोग्यविषयक महत्त्व व जनजागृतीसाठी जिल्ह्यात रानभाजी महोत्सव घेण्यात येत असून, त्याला नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे. शहरात शनिवारी आयोजित महोत्सवात ५० स्टॉलवर नागरिकांनी खरेदीसाठी झुंबड केली होती. ड्रॅगन फ्रुट, फांद्याची भाजी व बेसनाला नागरिकांनी अधिक पसंती दर्शवली. या महोत्सवादरम्यान अवघ्या काही तासातच ५० हजार ते १ लाख रुपयांपर्यंत उलाढाल झाल्याची माहिती आहे.
रानभाजी महोत्सवात या रानमेवांचा समावेश
रानभाजी महोत्सवात फांदीची भाजी, गवती चहा, पुदीना, अळूची पाने, करटुले, निवतीची भाजी, हडसन, अंबाडीची भाजी, कढीपत्ता, वाघाटे, चिवळची भाजी, सुरन कंद, केना, आघाटा, तांदुळजीरा, गुळवेल, ड्रॅगन फ्रुट, शेरणी, मुंगरी, तरोटा भाजी, आंबटचुका आदी भाज्यांचा समावेश होता.