शहरात चाेरट्यांचा धुमाकूळ; मध्यरात्री फाेडली नऊ दुकाने
By आशीष गावंडे | Published: February 29, 2024 05:46 PM2024-02-29T17:46:56+5:302024-02-29T17:47:03+5:30
या घटनेमुळे रामदासपेठ पाेलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्हं निर्माण झाले असून व्यावसायिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अकाेला: शहराच्या मध्यवर्ती भागातील अलंकार मार्केटमधील आठ व वाशिम बायपास परिसरातील एक अशी नऊ दुकाने फाेडून चाेरट्यांनी राेख रक्कम व माेबाइल साहित्यावर डल्ला मारल्याची घटना गुरुवारी पहाटे उजेडात आली. दाेन दुचाकीवरुन आलेले पाच ते सहा चाेरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. दरम्यान, या घटनेमुळे रामदासपेठ पाेलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्हं निर्माण झाले असून व्यावसायिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
चाेरट्यांनी शटरचे कुलूप न ताेडता त्यांनी शटर वाकवून आतमध्ये प्रवेश केल्याच्या ‘माेडस ऑपरेंडी’ने पाेलिस प्रशासनाची झाेप उडवली आहे. दुकानांमधील राेख रक्कम व माेबाइल साहित्य लंपास केले. हा सर्व प्रकार दुकानात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. चाेरट्यांना या सीसीटीव्हींचा कवडीचाही धाक वाटत नसल्यामुळे त्यांनी चेहऱ्यावर दुपट्टा न बांधता उघडपणे चाेरी करण्याचे धारिष्ट्य दाखवल्याचे दिसून येते. याप्रकरणी अविनाश महेशकुमार जेठाणी (३१)रा.सिंधी कॅम्प पक्की खाेली यांनी गुरुवारी रामदासपेठ पाेलिस ठाण्यात सर्व आठही दुकानांची फिर्यादी नाेंदवली. यामध्ये राेख रक्कम ३२ हजार ५०० रुपये व माेबाइल साहित्य असा एकूण ५२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चाेरी झाल्याचे नमुद केले आहे. तर वाशिम बायपास परिसरातील संताेष किराणा दुकान फाेडल्याची तक्रार जुने शहर पाेलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
या दुकानांना केले लक्ष्य
शारदा इलेक्ट्रीकल्स, टेकट्रीक इलेक्ट्रीकल्स, प्रशांत ट्रेडर्स, के.के.ट्रेडिंग कंपनी, इश्वर इंटरप्रायजेस, श्रीजी मार्केटींग, जैन उद्याेग नागपूरी जीन, गायत्री पाॅलइट्रेड, संताेष किराणा वाशिम बायपास.
पाेलिसांना आढळल्या दुचाकी
दाेन दुचाकीवरुन आलेल्या चाेरट्यांनी आठ दुकाने फाेडल्यानंतर त्यांनी वाशिम बायपास परिसरातील संताेष किराणा दुकान फाेडून त्यातील राेख रक्कम लंपास केली. पाेलिसांना पातूर मार्गाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत एमएच ३० एएच-४०४८ क्रमांकाची पल्सर व एमएच ३० एक्यू- ५८०३ क्रमांकाची बुलेट अशा दाेन दुचाकी आढळून आल्या. रामदासपेठ पाेलिसांनी दुचाकी ताब्यात घेतल्या आहेत.
क्यूआरकाेडचा वापर संशयाच्या घेऱ्यात
पाेलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी चाेरीच्या घटनांना आळा बसावा या उद्देशातून प्रत्येक पाेलिस ठाण्याच्या हद्दीत पाेलिस गस्तीसाठी लावण्यात आलेल्या क्यूआर काेडचा वापर बंधनकारक केला आहे. एक दुकान फाेडण्यासाठी चार मिनीटांचा अवधी ध्यानात घेतला तर चाेरट्यांनी ३२ मिनीट धुमाकूळ घातल्याचे लक्षात येते. या ३२ मिनीटांच्या कालवधीत गस्तीवरील पाेलिस कुठे हाेते,असा प्रश्न उपस्थित हाेताे.
आ.सावरकर यांची ‘एसपीं’साेबत चर्चा
या घटनेसंदर्भात आमदार रणधीर सावरकर यांनी पाेलिस अधीक्षक बच्चन सिंह यांच्यासाेबत चर्चा केली. चाेरट्यांना तातडीने अटक करुन पाेलिस यंत्रणेला सजग ठेवण्याची सूचना आ. सावरकर यांनी केली.