विद्युतचे ॲल्युमिनियम तार चोरणारी टोळी गजाआड; चार लाखांचा मुद्देमाल जप्त
By सचिन राऊत | Published: July 22, 2023 06:55 PM2023-07-22T18:55:59+5:302023-07-22T18:56:17+5:30
दहीहंडा व बोरगाव मंजू पोलीस स्टेशनच्या हद्दीत विद्युत वाहिनीचे ॲल्युमिनियमचे तार चोरणाऱ्या टोळीला अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांना यश आले आहे.
अकोला : दहीहंडा व बोरगाव मंजू पोलीस स्टेशनच्या हद्दीत विद्युत वाहिनीचे ॲल्युमिनियमचे तार चोरणाऱ्या टोळीला अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांना यश आले आहे. या दोन चोरट्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सुमारे चार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दहीहंडा व बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीत विद्युत वाहिनीच्या ॲल्युमिनियम तारची मोठ्या प्रमाणात चोरी झाल्याच्या तक्रारी दोन्ही पोलीस ठाण्यात दाखल आहेत. यावरून स्थानिक गुन्हे शाखा व संबंधित पोलिसांनी समांतर तपास सुरू केला असता स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीवरून या चोरीतील एक संषयीत आरोपी अकोट तालुक्यातील आडगाव येथे फिरत असल्याची माहिती मिळाली. यावरून पथकाने मोहम्मद शफी उर्फ शकू चोटा मोहम्मद युनूस यास ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता या आरोपीने मुर्तीजापुर येथील जुनी वस्ती परिसरातील रहिवासी संघर्ष प्रल्हाद गणवीर याच्या साथीने या दोन्ही पोलीस स्टेशनच्या हद्दीत विद्युत वाहिनीच्या ॲल्युमिनियम तारची चोरी केल्याची कबुली दिली.
यावरून दोन्ही आरोपींची आणखी कसून चौकशी केली असता त्यांनी ही विद्युत तार नांदुरा येथील रहिवासी शेख फिरोज शेख निसार याला विकल्याची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ४२५ किलो विद्युत वाहक अलोमीनियमचा तार तसेच या चोरीसाठी वापरलेली चार चाकी वाहन असा एकूण चार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.