सराव गावातील अतिसाराची साथ रोखण्यासाठी घरोघरी सर्वेक्षण

By रवी दामोदर | Published: July 14, 2024 04:05 PM2024-07-14T16:05:25+5:302024-07-14T16:06:18+5:30

गावात उपचाराची कोणतीही व्यवस्था नसताना आरोग्य विभागाकडून अंगणवाडी, जि. प. शाळा, सभागृह येथे ४०० ते ५०० रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत.

A house-to-house survey to prevent epidemics of diarrhea in villages in akola | सराव गावातील अतिसाराची साथ रोखण्यासाठी घरोघरी सर्वेक्षण

सराव गावातील अतिसाराची साथ रोखण्यासाठी घरोघरी सर्वेक्षण

अकोला : बार्शीटाकळी तालुक्यातील सराव येथे दूषित पाण्यामुळे अतिसाराच्या साथीचा उद्रेक झाला होता. गावातील नागरिकांना उलट्या, मळमळ, अतिसार असे रुग्ण आढळून येत होते. गावात साथ रोगाचा उद्रेक पाहता, १२ जुलै रोजी बार्शीटाकळी तालुका आरोग्य विभागाचे पथक तेथेे दाखल झाले. या आरोग्य पथकाने गेल्या दोन दिवसांपासून अहोरात्र प्रयत्न करून साथ आटोक्यात आणल्याचा दावा केला आहे. साथ रोखण्यासाठी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येत आहे.

गावात उपचाराची कोणतीही व्यवस्था नसताना आरोग्य विभागाकडून अंगणवाडी, जि. प. शाळा, सभागृह येथे ४०० ते ५०० रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. सराव येथे साथ रोगाची लागण १२ जुलैपासून सुरू झाल्याचे निदर्शनास आले असता अखेर आरोग्य विभागाने अतिशय कमी वेळेत आरोग्य टीम सराव येथे पोहोचून संपूर्ण साथ आटोक्यात आणली. सराव गावात २१२ घरे असून, लोकसंख्या ८०० आहे. शनिवारी फक्त ३४ रुग्ण अतिशय कमी लक्षणासोबत आढळून आले. त्यांच्यावर तातडीने औषधोपचार करण्यात आले.

मुख्य कार्यकारी बी. वैष्णवी यांनी शनिवारी सराव गावाला भेट देऊन पाहणी केली. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे, डॉ. विजय जाधव, तालुका आरोग्य अधिकारी रवींद्र आर्या, प्रभारी गटविकास अधिकारी बांगर, प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी सचिन राठोड, पांडुरंग तेलगोटे, शरद ठाकूर यांच्या संपूर्ण टीमने घरोघरी जाऊन सर्वेक्षण करून रुग्णांची तपासणी करून विलगीकरण कक्षात रुग्णांना तब्बल चार-चार तास निरीक्षणाखाली ठेवले. आताही आरोग्य यंत्रणा सराव गावात असून औषधोपचार करीत आहे.

२५ पाणी नमुने तपासणीसाठी
गावातील तब्बल २५ पाणी नमुने तपासणीसाठी नेले असून एकूण ३५ ओटी टेस्ट तीन तासांत करण्यात आलेल्या आहेत. ग्रामपंचायत येथील पाणीपुरवठा सुरळीत व सुस्थितीत करून संपूर्ण गावात निर्जंतुक पाण्याची कॅन वाटप करण्यात आली. मेडिक्लोवर वाटप करण्यात आले.

Web Title: A house-to-house survey to prevent epidemics of diarrhea in villages in akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Akolaअकोला