राग येऊन घर सोडून गेलेली अल्पवयीन मुलगी जळगाव खान्देशातील बालसुधारगृहात आढळली
By आशीष गावंडे | Published: May 31, 2024 07:55 PM2024-05-31T19:55:24+5:302024-05-31T19:55:33+5:30
अकाेला पाेलिसांनी अकाेट तालुक्यातील मुलीचा लावला शोध
अकाेला - राग आल्यामुळे घरातून निघून गेलेल्या अकाेट तालुक्यातील एका ११ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा आठ महिन्यानंतर शाेध लावण्यात अनैतिक मानवी वाहतुक कक्षाला यश मिळाले आहे. अकाेला पाेलिसांनी राज्यातील अनेक शहरांत या मुलीचा शाेध घेतल्यानंतर ती जळगाव खान्देश मधील बालसुधारगृहात असल्याची माहिती मिळाली. पाेलिस बालसुधारगृहातून मुलीला ताब्यात घेऊन तीच्या कुटुंबियांसह शुक्रवारी शहरात दाखल झाले.
अकाेट तालुक्यातून एक ११ वर्षाची अल्पवयीन मुलगी घरातून निघून गेल्याची तक्रार तीच्या पालकांनी १६ सप्टेंबर २०२३ राेजी अकाेट शहर पाेलिस स्टेशनमध्ये नाेंदवली हाेती. पाेलिसांनी शाेध घेतल्यानंतरही मुलीचा पत्ता लागत नव्हता. अखेर सदर प्रकरण अनैतिक मानवी वाहतुक कक्षाकडे हस्तांतरित करण्यात आले. या कक्षातील पाेलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुंबइ, पुणे, संभाजीनगरसह विविध शहरात शाेध घेतला,परंतु उपयाेग झाला नाही. तपासादरम्यान अल्पवयीन मुलगी ही जळगाव खान्देश येथील बाल सुधारक गृहात असल्याची माहिती गुप्त बातमीदारांकडून मिळाली. त्यामुळे तपास पथकाने जळगाव खान्देशमधील बाल कल्याण समितीच्या अध्यक्षांसाेबत संपर्क साधून मुलीबद्दल खातरजमा केली.
मुलीच्या कुटुंबियांनी मुलीला ओळखल्यानंतर पाेलिसांनी बाल कल्याण समिती अध्यक्षांसाेबत रितसर पत्रव्यवहार करुन मुलीला ताब्यात घेतले. मुलीचा शाेध घेण्याची कामगिरी अनैतिक मानवी वाहतुक कक्षाच्या प्रभारी पाेलिस निरीक्षक उज्वला देवकर, ‘एपीआय’ कविता फुसे, ‘पीएसआय’ मनोहर वानखडे, पोहेकॉ सुरज मंगरूळकर, धनराज चव्हाण, प्रदीप उंबरकर, पुनम बचे, अविंद्र खोडे, पुजा चंदन यांनी पार पाडली.
मुलीचे आई-वडील अशिक्षीत,गरीब
मुलीचे पालक हातमजूरी करुन उदरनिर्वाह करतात. ते अशिक्षीत व गरीब असल्यामुळे मुलीचा शाेध कसा घ्यायचा, असा प्रश्न त्यांच्यासमाेर उपस्थित झाला हाेता. अकाेला पाेलिसांनी मुलीचा शाेध घेतल्याचा आनंद त्या पालकांच्या चेहऱ्यावर मावत नव्हता.