कुख्यात गुंडाला मध्यप्रदेशातून शिताफीने केली अटक
By आशीष गावंडे | Published: July 5, 2024 08:47 PM2024-07-05T20:47:57+5:302024-07-05T20:48:07+5:30
दराेडा प्रकरण; ‘एलसीबी’ची धाडसी कारवाइ
अकाेला: शहरातील उद्याेजक केडिया यांच्या निवासस्थानी घातलेल्या दराेडा प्रकरणी चाैथा आराेपी व २१ पेक्षा अधिक गंभीरस्वरुपाचे गुन्हे दाखल असलेल्या कुख्यात गुंडाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मध्यप्रदेशातून बेड्या ठाेकल्या.
हेमंत पुनमचंद लुनिया (४८)रा. नावदा ता.महू जि. इंदौर असे अटक केलेल्या कुख्यात गुंडाचे नाव आहे. न्यू आळशी प्लाॅटमधील उद्याेजक नवलकिशाेर केडिया यांच्या निवासस्थानी रात्री १० च्या सुमारास चारचाकी वाहनातून आलेल्या चार ते पाच इसमांनी घरात शिरकाव करुन लुटमार केल्याची घटना २७ जून राेजी घडली हाेती. जिल्हा पाेलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी घटनास्थळावर जाऊन केडिया कुटुंबियांची विचारपूस केल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख शंकर शेळके यांना तपासकामी पथके रवाना करण्याचे निर्देश दिले हाेते. २ जुलै राेजी स्थानिक गुन्हे शाखा व खदान पाेलिसांच्या संयुक्त कारवाइत प्रकरणाचा मास्टर माइंड पुष्पराज शाहा याला सुरतमधून व सचिन शाहा, विनायक देवरे या दाेन जणांना नाशिक येथून अटक करण्यात आली हाेती. इतर तीन फरार आराेपींचा शाेध घेण्यासाठी ‘एलसीबी’ची पथके रवाना झाली हाेती.
लुनियाविराेधात गंभीर स्वरुपाचे गुन्हे
जिल्हा पाेलिस अधीक्षकांच्या निर्देशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मध्यप्रदेशकडे रवाना झाले हाेते. लुनिया विराेधात मध्यप्रदेशात खुन करणे, खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, अवैध अग्निशस्त्र बाळगणे, डेपोतून डिझेल चोरी, अवैधरित्या दारू विक्री, पॅरोल वरून फरार राहणे असे गंभीर स्वरूपाचे एकुण २१ गुन्हे दाखल आहेत. गुन्ह्यात वापरलेली पांढऱ्या रंगाची कार क्रमांक एमपी-०९-झेड एम-८४६८ जप्त करण्यात आली असून आरोपीला खदान पाेलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
नाशिकमध्ये दराेड्याचा कट
कुख्यात गुंड लुनिया व त्याच्या साथीदारांनी १० जून राेजी इंदाैर परिसरातील मुंबई ते दिल्ली (भारत पेट्रोलीयम)ची पाईप लाईन फोडून त्यातून मोठ्या प्रमाणात डिझेलची चोरी केली हाेती. याप्रकरणी ताे फरार होवून नाशिक येथे आला होता. येथेच केडिया यांच्या घरी दरोड्याचा कट आखण्यात आल्याची माहिती आहे. यादरम्यान, केडिया प्रकरणी तीन जणांना अटक झाल्याचे समजताच गुंड लुनिया त्याचे दोन्ही मोबाईल बंद करून फरार झाला होता. त्यामुळे त्याला शाेधून काढण्याचे ‘एलसीबी’समाेर आव्हान ठाकले हाेते.