अमरनाथच्या दरीत कोसळून अकोल्याचा यात्रेकरू गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2022 11:22 AM2022-07-05T11:22:34+5:302022-07-05T11:22:53+5:30
A pilgrim from Akola was seriously injured at Amarnath : खेचरावर बसून दर्शन करून परत येत असताना बारारीमार्गावर खेचराचा तोल गेला आणि तोष्णेवाल हे सिंध नदीच्या दिशेने १०० फूट दरीत कोसळले.
अकोला: अमरनाथ यात्रेला गेलेले अकोला येथील सत्यनारायण तोष्णीवाल (५३) हे सोमवारी खेचरासह दरीत पडल्याने गंभीर जखमी झाले. त्यांना लष्कराच्या जवानांनी रुग्णालयात दाखल केले. मुलगी व पत्नीसोबत ते दर्शनासाठी गेले होते. त्यांचे नातेवाईक कश्मीर करिता रवाना झाले आहेत.
अकोला शहरातील रेल्वे स्थानक मार्गावर असलेल्या वसंत देसाई क्रीडांगणासमोर भागवत वाडी येथील अपार्टमेंट मधील रहिवासी व औषध विक्रेते सत्यनारायण तोष्णीवाल यांची मुलगी एमबीबीएस उत्तीर्ण झाल्यामुळे ते पत्नी आणि मुलीसह अमरनाथ यात्रेला गेले होते. ते खेचरावर बसून दर्शन करून परत येत असताना बारारीमार्गावर खेचराचा तोल गेला आणि तोष्णेवाल हे सिंध नदीच्या दिशेने १०० फूट दरीत कोसळले. त्यामुळे त्यांच्या डोक्याला आणि छातीला गंभीर दुखापत झाली आहे. भारतीय लष्कराच्या बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेत त्यांना बारारीमार्गे सैन्य दलाच्या शिबिरात हलवले, अशी माहिती संरक्षण दलाचे जनसंपर्क अधिकारी यांनी दिली.
सत्यनारायण तोष्णीवाल यांचे पोळा चौकात नर्मदा मेडिकल असून, अकोट फाईल परिसरात सुद्धा माहेश्वरी नावाचे त्यांचे औषध विक्रीचे दुकान आहे.