‘जय परशुराम’च्या घोषात शहरातून शोभायात्रा, ठिकठिकाणी स्वागत
By नितिन गव्हाळे | Published: May 9, 2024 08:52 PM2024-05-09T20:52:00+5:302024-05-09T20:52:45+5:30
शोभायात्रेत रथावर विराजमान भगवान परशुराम यांची मूर्ती आकर्षक होती. तसेच चित्ररथांवर विठ्ठल-रुख्मिणीसह भगवान परशुरामाची वेशभूषा केलेल्या बालकांनी लक्ष वेधून घेतले.
अकोला : भगवान परशुराम जन्मोत्सव समितीच्या वतीने ब्राह्मण समाजाचे आराध्य दैवत भगवान परशुराम यांच्या जन्मोत्सवानिमित्त ९ मेरोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास खोलेश्वर येथे महाआरती करून शाेभायात्रेची वाजत-गाजत सुरुवात करण्यात आली. ‘जय परशुराम’च्या जयघोषात शहरातील प्रमुख मार्गांवरून शोभायात्रा काढण्यात आली.
प्रारंभी भगवान परशुराम यांच्या मूर्तीचे संयोजक अशोक शर्मा, कृष्णा गोवर्धन शर्मा यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. शोभायात्रेच्या अग्रभागी अश्व, भगवान परशुराम यांची मूर्ती असलेला रथ होता.
ब्राह्मण समाज बांधवांनी जय परशुरामचा जयघोष करून परिसर दणाणून सोडला. ही शोभायात्रा परशुराम चौक खोलेश्वर येथून निघून चित्रा टॉकीज चौक, सिटी कोतवाली चौक, कपडा बाजार, सराफा बाजार, गांधी चौक, वसंत टॉकीज मार्गे खोलेश्वर येथे पोहोचली. याठिकाणी शोभायात्रेचा समारोप करण्यात आला. शोभायात्रेमध्ये विभाग संघचालक प्रा. नरेंद्र देशपांडे, प्रा. अनुप गोवर्धन शर्मा, विजय तिवारी, उदय महा, राजेश मिश्रा, कपिल रावदेव, गिरीश गोखले, नीलेश देव, मोहन पांडे, रामप्रकाश मिश्रा, बाळकृष्ण बिडवई, ॲड. सत्यनारायण जोशी, सिद्धार्थ शर्मा, मंगलप्रसाद पांडे, अश्विन पांडे, लल्लन मिश्रा, ब्राह्मण समाज युवा मंचाचे अध्यक्ष राकेश शर्मा, देवेंद्र तिवारी, राजेंद्र तिवारी, आनंद शास्त्री, कुशल सेनाड, अमोल चिंचाळे, अक्षय गंगाखेडकर, विवेक शुक्ला, राजेश व्याम्बरे, गोपाल राजवैद्य, सीमा शुक्ल, कीर्ती शास्त्री, लता शर्मा, विद्यादेवी शर्मा, शशी तिवारी, मनीषा तिवारी, कीर्ती मिश्रा, कीर्ती शर्मा, दुर्गा जोशी, रश्मी जोशी, अंजली जोशी, नेहा कुलकर्णी, दीपाली देशपांडे, चंदा शर्मा, सुनीता तिवारी, तारा शर्मा आदींसह सकल ब्राह्मण समाज संघटनांचे पदाधिकारी व भगवान परशुराम जन्मोत्सव समितीचे पदाधिकारी सहभागी झाले होते.
भगवान परशुराम यांच्या जन्मोत्सवानिमित्त गुरुवारी सायंकाळी सिव्हिल लाईन चौक जि. प. विश्रामगृह येथून युवकांनी दुचाकी रॅली काढली. वाजतगाजत काढलेल्या रॅलीत युवकांनी ‘जय परशुराम’च्या घोषणा दिल्या. ही दुचाकी रॅली सिव्हिल लाईन्स चौक, मोठे पोस्ट ऑफिस, हुतात्मा मदनलाल धिंग्रा चौक, खुले नाट्यगृह, गांधी रोड मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालय, सरकारी बगिचा असे मार्गक्रमण करीत खोलेश्वर येथील शोभायात्रेत विलीन झाली.
माहेश्वरी समाज ट्रस्ट, भाजपतर्फे स्वागत
खोलेश्वर परिसरात भगवान परशुराम जन्मोत्सव समितीच्या शोभायात्रेचे माहेश्वरी समाज ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी पुष्पवर्षाव करून स्वागत केले. तसेच शोभायात्रेत सहभागी समाज बांधवांसाठी अल्पोपाहार व जलपानाची व्यवस्था करण्यात आली होती. सिटी कोतवाली चौकात भाजपच्या वतीने जिल्हाध्यक्ष किशोर मांगटे पाटील, भाजप लोकसभा निवडणूक संयोजक विजय अग्रवाल, सतीश ढगे, गिरीश जोशी आदींनी शोभायात्रेचे स्वागत केले. शोभायात्रा मार्गावर स्व. शिवपाल शर्मा परिवाराच्या वतीने कुल्फीचे वितरण करण्यात आले. शालिनी टॉकीज येथे नगरसेवक अजय शर्मा यांच्या वतीने शोभायात्रेमध्ये सहभागी सर्वांना शीतपेयांचे वितरण करण्यात आले.
चित्ररथांनी वेधले लक्ष
शोभायात्रेत रथावर विराजमान भगवान परशुराम यांची मूर्ती आकर्षक होती. तसेच चित्ररथांवर विठ्ठल-रुख्मिणीसह भगवान परशुरामाची वेशभूषा केलेल्या बालकांनी लक्ष वेधून घेतले.
मंदिरात आज जन्मोत्सव
शुक्रवार, १० मेरोजी सकाळी ११ वाजता भगवान परशुराम जन्मोत्सव व महाआरती परशुराम मंदिर खोलेश्वर येथे साजरा करण्यात येणार आहे.