‘वंचित’चे शक्तीप्रदर्शन; प्रकाश आंबेडकर यांची उमेदवारी दाखल! अकोला शहरात काढली रॅली
By संतोष येलकर | Published: April 4, 2024 05:30 PM2024-04-04T17:30:33+5:302024-04-04T17:31:31+5:30
अकोला लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश बाळासाहेब आंबेडकर यांनी गुरुवार, ४ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला.
संतोष येलकर,अकोला : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अकोला लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश बाळासाहेब आंबेडकर यांनी गुरुवार, ४ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला. शहरात काढण्यात आलेल्या रॅलीद्वारे शक्तीप्रदर्शन करीत उमेदवारी दाखल केल्यानंतर निवडणुकीत विजयाचा निर्धार करण्यात आला.
अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी गुरुवारी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांची उमेदवारी दाखल करण्यासाठी अकोला शहरातील टाॅवरस्थित वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा कार्यालयापासून रॅली काढण्यात आली. टाॅवर चौक, फतेह चौक, खुले नाट्यगृह चौक, पंचायत समितीसमोरून मार्गक्रमण करीत रॅली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोहोचल्यानंतर अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अजित कुंभार यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी डाॅ. हर्षवर्धन मालोकार, पक्षाचे शहर अध्यक्ष मजहर अली, बालमुकुंद भिरड, युवक आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे, जिल्हा परिषद अध्यक्ष संगीता अढाऊ, बळीराम चिकटे, अमर डिकाव, गजानन दांडगे, सिद्धार्थ सिरसाट, माजी सभापती आकाश शिरसाट, प्रदेश उपाध्यक्ष अनिल जाधव आदी उपस्थित होते.
रॅलीत उसळली गर्दी !
वंचित बहुजन आघाडीच्यावतीने शहरात काढण्यात आलेल्या रॅलीत अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यासह पक्षाच्या नेत्या प्रा. अंजली आंबेडकर, युवा नेते सुजात आंबेडकर यांच्यासह जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, महासचिव मिलिंद इंगळे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष प्रभा शिरसाट, अॅड. संतोष राहाटे, गजानन गवई, डाॅ. संतोष हुशे, समाजकल्याण सभापती आम्रपाली खंडारे आदींसह पक्षाचे जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती.
विजय खेचून आणण्याची जिद्द बाळगूया : प्रकाश आंबेडकर
लोकसभा निवडणुकीत मतांच्या स्वरुपात क्रिया करायची आहे. त्यासाठी ‘इलेक्शन मोड ’ मध्ये येऊन काम करण्याचा सल्ला अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिला. मतदारांना मतदान बूथपर्यंत घेऊन जाण्याचे सांगत निवडणुकीत विजय खेचून आणण्याची जिद्द बाळगूया, असा निर्धारही आंबेडकर यांनी यावेळी व्यक्त केला.
अकोल्याच्या विकासासाठी ही निवडणूक महत्वाची : सुजात आंबेडकर
संविधान आणि लोकशाही वाचविण्यासोबतच अकोला शहराच्या विकासासाठी ही लोकसभा निवडणूक महत्वाची आहे. त्यानुषंगाने ही निवडणूक ताकदीने लढण्याचा निर्धार करण्याचे आवाहन पक्षाचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी केले.