अकोल्यात शिवसैनिकाने केला आत्मदहनाचा प्रयत्न

By Atul.jaiswal | Published: February 5, 2024 05:22 PM2024-02-05T17:22:55+5:302024-02-05T17:25:06+5:30

आमदार नितीन देशमुख याच्यासह इतर पदाधिकारी व  कार्यकर्त्यांनी प्रसंगावधान दाखवल्यामुळे पुढील अनर्थ टळला.

A Shiv Sainik attempted self-immolation in Akola | अकोल्यात शिवसैनिकाने केला आत्मदहनाचा प्रयत्न

अकोल्यात शिवसैनिकाने केला आत्मदहनाचा प्रयत्न

अकोला : शहरातील तुकाराम चौक ते मलकापूरपर्यंतच्या रस्त्यासाठी गत सात दिवसांपासून सुरु असलेल्या उपोषणाची दखल न घेतल्याने शिवसेना उद्धव ठाकरे गटाने सोमवार, ५ फेब्रुवारी रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर धडक दिली. अधीक्षक अभियंता यांच्या दालनात चर्चा सुरु असताना माजी नगरसेवक मंगेश काळे यांनी अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. आमदार नितीन देशमुख याच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रसंगावधान दाखवल्यामुळे पुढील अनर्थ टळला. शिवसैनिक आक्रमक झालेले पाहून अधीक्षक अभियंता यांनी तातडीने रस्त्याचे काम सुरू करण्याचे आदेश दिले.

तुकाराम चौक ते मलकापूर रस्त्याची सात वर्षांपासून दयनीय अवस्था असून यामुळे अनेक अपघात झालेले आहेत. या रस्त्याचे काम करण्यात यावे म्हणून नगरसेवक मंगेश काळे मित्रमंडळाने सोमवारी २९ जानेवारीपासून मंगेश काळे मित्र मंडळ व व निर्भय बनो जन आंदोलनाचे संयोजक गजानन हरणे, प्रमोद धर्माळे, अविनाश मोरे हे उपोषण करीत आहेत. या रस्त्यासह पाइपलाइन दुरुस्ती व स्ट्रीट लाइटची कामे त्वरित पूर्ण व्हावी ही मागणी त्यांनी केली आहे. 
 बांधकाम विभाग, मनपा आयुक्त, जिल्हा प्रशासन, अधिकारी लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनाची दखल घेत नसल्यामुळे रविवार, ४ जानेवारी रोजी मलकापूरमध्ये कळकळीत बंदही पाळण्यात आला.

स्थानिक व्यापारी दुकानदार यांनी आपले दुकान प्रतिष्ठान बंद ठेवून सहकार्य केले. सोमवार, ५ फेब्रुवारी रोजी आमदार नितीन देशमुख, माजी आमदार संजय कराळे,  जिल्हाप्रमुख गोपाल दातकर, माजी नगरसेवक राजेश मिश्रा, राहुल कराळे, मंगेश काळे हे शिवसैनिकांसह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी गेले. त्यावेळी मंगश काळे यांनी सोबत आणलेली डिझेलची बॉटल अंगावर ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी आमदार नितीन देशमुख याच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रसंगावधान दाखवल्यामुळे पुढील अनर्थ टळला.

Web Title: A Shiv Sainik attempted self-immolation in Akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.