सर्वोपचार रुग्णालयात आढळला सहा फुटांचा अजगर
By Atul.jaiswal | Published: February 21, 2023 05:29 PM2023-02-21T17:29:11+5:302023-02-21T17:29:27+5:30
शवविच्छेदन कक्षाजवळ भला मोठा अजगर सरपटत असल्याचे स्थानिक कर्मचाऱ्यांना दिसून आले.
अकोला : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय परिसरातील शवविच्छेदन कक्षाजवळ मंगळवारी (दि. २१) सहा फूट लांबीचा अजगर आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. दरम्यान, हा अजगर जखमी असल्याचे निदर्शनास आल्यानंतर मानद वन्यजीव रक्षक तथा सर्पमित्र बाळ काळणे यांनी त्याला काळजीपूर्वक पकडून त्याच्यावर पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचार केले.
शवविच्छेदन कक्षाजवळ भला मोठा अजगर सरपटत असल्याचे स्थानिक कर्मचाऱ्यांना दिसून आले. हेमंत इंगळे, उमेश रामटेके, कैलास चांदूरकर, आनंद खिरवाल, प्रकाश गोडाले, विनोद पारीचे या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या परिचयाचे सर्पमित्र बापू देशमुख यांना कळविले, बापू देशमुख यांनी याबाबत वन विभागाला कळविले. वन परिक्षेत्र अधिकारी डांगे व वनपान गजानन इंगळे यांच्या निर्देशानुसार सर्पमित्र बाळ काळणे यांनी घटनास्थळी पोहोचून जखमी अजगराला पकडले व शासकीय पशुवैद्यकीय रुग्णालयात घेऊन गेले. तेथे डॉ. पी. एन. राठोड, डॉ. प्रदीप गावंडे, डॉ. वर्षा चोपडे व रुपेश बोराळे यांनी जखमी अजगरावर उपचार केले. उपचार करतेवेळी वन विभागाचे यशपाल इंगोले, आलासिंह यांनी सहकार्य केले. उपचारानंतर अजगर सुरक्षित असल्याचे बाळ काळणे यांनी सांगितले.