पूर्व क्षितिजावर गुरुवारी चंद्र-शुक्र युतीचा अपूर्व नजारा; अकोल्यातही पाहता येणार अनोखा क्षण
By Atul.jaiswal | Published: November 7, 2023 12:11 PM2023-11-07T12:11:39+5:302023-11-07T12:14:00+5:30
काही कालावधी पर्यंत शूक्र ग्रह चंद्रबिंबाआड जाईल.
अतुल जयस्वाल, अकोला: सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी आणि आपल्या पृथ्वीला सर्वात जवळ असलेला शूक्र ग्रह पहाटे पूर्व क्षितिजावर अत्यंत ठळक स्वरूपात दर्शन देत असुन, गुरुवार ९ नोव्हेंबर रोजी या ग्रहाची चंद्रासोबत युती घडुन येत आहे. हा अपूर्व नजारा नुसत्या डोळ्यांनी अनुभवण्याची अपूर्व संधी चालून आली आहे.
पहाटेच्या वेळी आपल्या भागात हे दोन्ही खगोल एकमेकांना अधिक जवळ युती स्वरूपात असतील तर काही भागात पीधान युती होईल. म्हणजेच काही कालावधी पर्यंत शूक्र ग्रह चंद्रबिंबाआड जाईल. यादिवशी शूक्र ग्रह उत्तर रात्री सव्वा तीनच्या सुमारास तर चंद्र साडेतीनच्या सुमारास पूर्व क्षितिजावर उदय पावुन सकाळी सव्वा नऊच्या सुमारास आकाश मध्याशी येतील. याच रोजी दिवसा सुद्धा शूक्र दर्शन होऊ शकते.
चंद्र व शूक्र ग्रह कन्या राशीत असुन चंद्राची अकरावी तर शूक्र ग्रहाची नवमीची कला असेल. चंद्रकोर आणि शूक्र हे दोन्ही खगोल एकमेकांच्या अगदी जवळ असतानाचे दृश्य सर्व आकाश प्रेमींनी पहाटे चार ते सहा या वेळात अवश्य आपल्या डोळ्यात साठवावे एवढे अप्रतिम स्वरूपात असेल. यावर्षी दिवाळीच्या उत्सवात आकाशही सहभागी होणार असल्याने आपला आनंद द्विगुणित करण्यासाठी समस्त आकाश प्रेमींनी सज्ज व्हायला हवे असे आवाहन ज्येष्ठ खगोल अभ्यासक प्रभाकर दोड यांनी केले आहे.